Donald Trump on India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत आज सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात आगपाखड केली आहे. भारताबरोबर आमचे एकतर्फी व्यापार संबंध होते, असे ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर त्यांनी एक लांबलचक पोस्ट टाकून भारताशी असलेल्या व्यापार संबंधावर भाष्य केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे की, आम्ही (अमेरिका) भारताबरोबर अतिशय कमी व्यापार करतो. पण ते मात्र आमच्याकडे चांगला व्यापार करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ते आमच्या देशात भरमसाठ विक्री करतात. आम्ही त्यांचे मोठे क्लाईंट आहोत. पण आमच्या अतिशय कमी वस्तू तिथे विकल्या जातात. त्यामुळे हा एकतर्फी व्यापार संबंध असून अनेक दशकांपासून हे चालू आहे.”

भारताने अमेरिकेवर भरमसाठ आयातशुल्क लादल्यामुळे अमेरिकन व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू भारतात विकता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही याला एकतर्फी आपत्ती असे म्हणतो, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरणे आयात करतो. मात्र अमेरिकेकडून तेवढ्या प्रमाणात आयात करत नाही.

https://truthsocial.com/@realDonaldTrump/115129261076571259

भारताने ‘त्यासाठी’ उशीर केला

भारताने अमेरिकेवर शून्य आयातशुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला होता. पण हे पाऊल खूप आधीच उचलायला हवे होते, असेही ट्रम्प म्हणाले. “ते आता आयातशुल्क काढून टाकण्यासंदर्भात प्रस्ताव देत आहेत. पण यासाठी आता खूप उशीर झाला आहे. हे खूप वर्षांआधीच व्हायला हवे होते”, असे ते म्हणाले.

३१ जुलै रोजी अमेरिकेने सर्व भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा एकदा कार्यकारी आदेश देत रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादले. भारताच्या आयातीमुळे रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यासाठी रसद मिळत आहे, असा आरोप करण्यात आला.

भारतावर ५० टक्के आयातशुल्काची घोषणा झाल्यापासून दोन्ही देशांती संबंध ताणले गेले आहेत. त्यातच ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी मागच्या आठवड्यात रशिया-युक्रेन युद्धाचे वर्णन मोदींचे युद्ध असे केल्यामुळे द्वीपक्षीय संबंधात आणखी तणाव निर्माण झाला आहे.