Trump Tariff News: गेल्या दोन महिन्यांपासून टॅरिफ (आयातशुल्क) लादून जगभरातील बाजारपेठांना धक्का देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले धक्कातंत्र अद्यापही सुरूच ठेवले आहे. आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून विदेशातून येणाऱ्या लाकूड आणि लाकडी सामानांवर २५ टक्के आणि १० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेतील गृह उत्पादनांची मागणी वाढविण्यासाठी सदरचा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, अनेक देश अमेरिकन बाजारपेठेत स्वस्त लाकडापासून बनविलेल्या वस्तू पाठवत आहेत. ज्यामुळे अमेरिकेच्या मूळ उत्पादनांवर त्याचा परिणाम होत आहे. व्यापाराची ही चुकीची पद्धत असून अमेरिकेतील कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

नवी घोषणा काय आहे?

नवीन घोषणेनुसार, परदेशी सॉफ्टवुड लाकूड आणि तर लाकडावर १० टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे. तसेच किचन कॅबिनेट आणि अपहोल्स्टर्ड लाकडी फर्निचर आणि व्हॅनिटीजवर २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर पासून या निर्णयांची अंमलबजावणी सुरू होईल.

ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, आधीच काही देशांवर लागू केलेल्या आयातशुल्कामुळे लाकडी वस्तू महागल्या आहेत. चीन आणि व्हिएतनामधून मोठ्या प्रमाणात लाकूड आणि लाकडाच्या वस्तूंची निर्यात होत असते. २०२४ मध्ये या दोन्ही देशांनी १२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे.

लाकडाची आयात राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका

अमेरिकेच्या वित्त विभागाचे सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्या म्हणण्यानुसार, लाकडाची उत्पादने ही लष्कर आणि युद्ध विभागात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अनेक कारवायांसाठी चाचणी करणे, पायाभूत सुविधा बांधणे, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि सामानांची साठवणूक करण्यासाठी ही सामग्री वापरली जाते. अशावेळी विदेशातून आयात केलेल्या वस्तू धोकादायक ठरू शकतात.

अमेरिकेतील ग्राहकांचेच नुकसान?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण आखले आहे. त्याअंतर्गत ते विविध वस्तूंवर आणि देशांवर भरमसाठ आयातशुल्क लादत आहेत. याआधी त्यांनी ब्रँडेड आणि पेटंट औषधांवरही १०० टक्के टॅरिफ लागू केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे वरकरणी अमेरिकेसाठी सदर निर्णय घेत असल्याचे सांगत असले तरी काही आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे की, यामुळे अमेरिकेतील ग्राहकांचेच नुकसान होणार आहे.