Donald Trump Meet Kim Jong Un : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून आजपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या अतिरिक्त धोरणांची जगात मोठी चर्चा झाली. एवढंच नाही तर ट्रम्प सातत्याने कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इस्रायलचा दौरा केला होता. त्याआधी ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचाही दौरा केला होता. सौदी अरेबियाच्या दौऱ्यात अनेक मोठे करार देखील झाले होते.

दरम्यान, त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प लवकरच आशिया दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही भेट नक्की होणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. या संदर्भातील वृत्त सीएनएनच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यातील संभाव्य बैठक आयोजित करण्याबाबत खासगीरित्या चर्चा केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी अशा भेटीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही पावलं उचलेले नाहीत. मात्र, तसेच या भेटीबाबत अद्याप व्हाईट हाऊसने देखील काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, या अहवालात असंही म्हटलं आहे की ट्रम्प यांनी या वर्षाच्या सुरुवातीला किम जोंग उन यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, उत्तर कोरियाने त्यांचं पत्र स्वीकारलं नव्हतं आणि त्यावर उत्तर कोरियाकडून काहीही उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांची जून २०१९ मध्ये भेट घेतली होती. उत्तर कोरियामध्ये पाऊल ठेवणारे ते पहिले विद्यमान अमेरिकेचे अध्यक्ष ठरले होते.

उत्तर कोरियाच्या माध्यमांनुसार, किम जोंग उन यांनी गेल्या महिन्यात उत्तर कोरियाच्या संसदेसमोर भाषण करताना ट्रम्प यांच्याशी भेटण्याच्या संदर्भात सूचक भाष्य केलं होतं. “व्यक्तिशः मला अजूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चांगल्या आठवणी आहेत. जर अमेरिकेने वास्तवाच्या आधारे उत्तर कोरियाबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारला तर आपण अमेरिकेबरोबर न चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही”, असं किम जोंग उन यांनी भाषणात म्हटलं होतं.