Donald Trump ultimatum to Hamas amid Gaza war : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी हमास या दहशतवादी संघटनेला कठोर शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे. हमासने इस्रायलबरोबर रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शांतता करार केलाच पाहिजे अन्यथा सर्व उद्ध्वस्त होईल असे ट्रम्प असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच हमासला त्यांचा शांतता करार स्वीकार करण्याची, इस्रायली ओलिसांना सोडण्याची आणि संघर्ष संपवण्याची ही शेवटची संधी दिली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आधीच युद्धविरामाच्या कराराला सहमती दर्शवली आहे. आता या इशाऱ्यानंतर हमास काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून गाझा येथे सुरू असलेले युद्ध थांबवण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता करारासाठी दोन्ही बाजूंवर दबाव टाकत आहेत. ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी २० मुद्द्यांचे प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात फक्त तात्काळ युद्ध थांबवण्याची मागणीच नाही तर, युद्धानंतर गाझातील प्रशासन कसे असेल, यासाठीची फ्रेमवर्क देखील त्यांनी मांडली आहे.
ट्रम्प यांची पोस्ट
“मध्यपूर्वेत आपण कोणत्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित करू. हिंसा आणि रक्तपात थांबेल. आता मृत झालेल्यांच्या मृदतेहांसह सर्व ओलिसांना सोडा! वॉशिंग्टन, डीसी वेळेनुसार रविवारी संध्याकाळी ६ पर्यंत हमासबरोबर करार झालाच पाहिजे. त्यावर प्रत्येक देशाने सही केली आहे! जर ही अखेरची संधी असलेला करार झाला नाही तर हमासविरूद्ध यापूर्वी कोणीही पाहीला नसेल असा विध्वंस होईल,” अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केली आहे.
ट्रम्प यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याला नरसंहार म्हटले आहे, तसेच त्यांनी मध्यपूर्वेत हमास अनेक वर्षांपासून ‘निर्दयी’ आणि ‘हिंसक धोका’ राहिल्याचे म्हटले आहे.
गाझासाठी ट्रम्प यांचा प्रस्ताव काय आहे?
मागील दोन वर्षांत हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला इस्रायल-हमास संघर्ष संपुष्टात यावा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० मुद्द्यांचा समावेश असलेला शांततेचा प्रस्ताव जाहीर केला आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावाला इस्रायलने मान्यता दिली आहे, तर यावर अभ्यास करून प्रतिसाद देऊ, अशी प्रतिक्रिया हमासने दिली होती.
ट्रम्प यांच्या या प्रस्तावानुसार, युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभागात तात्पुरते प्रशासकीय मंडळ तयार करण्यात येणार असून, त्याचे नेतृत्व खुद्द डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचाही या मंडळात समावेश असेल. या नियोजनानुसार, गाझामधील लोकांना दुसरीकडे विस्थापित होण्याची गरज नाही. युद्धविराम लागू झाल्यानंतर ७२ तासांत हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक जिवंत अथवा मृत परत द्यावेत; तसेच पॅलेस्टाइनमधील प्रशासनात हमासला यापुढे कुठलीही भूमिका बजावता येणार नाही, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.