Donald Trump Speech On Illegal Immigration At UNGA: न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बराच वेळ बेकायदेशीर स्थलांतराविरुद्ध बोलले. यामध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतराविरुद्ध केलेल्या कारवाईवर प्रकाश टाकला आणि इतर देशांनाही असेच उपाय अवलंबण्याचे आवाहन केले.
तुमचा देश उद्ध्वस्त करत आहेत
ते म्हणाले की, “आम्ही बायडेन प्रशासनाचे खुल्या सीमा (ओपन बॉर्डर) धोरण रद्द केले आणि आमच्या देशात घुसलेल्या गुन्हेगारांना परत पाठवले.” यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेस उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांना सांगितले की, ते “अगदी याच परिस्थितीत” आहेत आणि बेकायदेशीर स्थलांतरित “तुमचा देश उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे तुम्हाला यासाठी पावले उचलावी लागतील.” याचबरोबर ट्रम्प यांनी युरोपीय देशांना त्यांच्या खुल्या सीमा धोरणांसाठी फटकारले.
भारत आणि चीनवर आरोप
या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी भारत आणि चीनवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून रशिया-युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप केला. ट्रम्प म्हणाले की, “चीन आणि भारत हे रशियन तेल खरेदी करत असून, ते या युद्धाला निधी पुरवत आहेत. नाटो देशांनीही रशियन ऊर्जा आणि रशियन ऊर्जा उत्पादनांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत. हे मला दोन आठवड्यांपूर्वी कळले आणि यामुळे मी नाराज आहे.”
युरोपियन देशांवर टीका
युरोपीय देशांवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ते स्वतःविरुद्धच्या युद्धाला निधी देत आहेत. जर रशियाने युद्ध संपवण्यासाठी करार करण्यास नकार दिला तर अमेरिका रशियावर कठोर टॅरिफ लादण्यास पूर्णपणे तयार आहे, ज्यामुळे हा रक्तपात लवकरच थांबेल असे मला वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांचे काम मी करत आहे
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सात मोठी युद्धे थांबवल्याचा दावा केला. ते म्हणाले, “कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने, पंतप्रधानाने किंवा अगदी कोणत्याही देशाने असे काहीही केलेले नाही. मी हे फक्त सात महिन्यांत केले. हे यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. युद्धे थांबवल्याचा मला अभिमान वाटतो. संयुक्त राष्ट्रांऐवजी मला हे काम करावे लागले हे खूप वाईट आहे. दुर्दैवाने, या सर्व प्रकरणांमध्ये, संयुक्त राष्ट्रांनी मदत करण्याचा प्रयत्नही केला नाही.”