Donald Trump-Vladimir Putin Meet : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करत आहे, तर त्या हल्ल्याला युक्रेनही जशास तसं उत्तर देत आहे. या दोन्ही देशातील संघर्षाचे परिणाम दुसऱ्या काही देशांवर देखील होत आहेत. मात्र, रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप हा संघर्ष थांबवण्यास ट्रम्प यांना यश आलेलं नाही.
दरम्यान, आता रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कामध्ये भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत कोणता मोठा निर्णय होतो? रशिया-युक्रेन संघर्षावर काय तोडगा निघणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. पण व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफमुळेच रशिया युक्रेनबरोबरच्या संघर्षावरील चर्चेसाठी प्रवृत्त झाला असल्याचं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरील चर्चा चांगली झाली तर ते (ट्रम्प) युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना फोन करतील आणि आम्ही जिथे भेटणार आहोत, तिथे त्यांना घेऊन जातील असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुतिन यांच्या भेटीपूर्वी ट्रम्प म्हणाले की, “भारतावर लादलेल्या आयातशुल्कामुळे (टॅरिफ) रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून त्यांना रोखलं गेलं आणि मॉस्कोला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यात त्यांनी (भारताने) भूमिका बजावली असावी. मला वाटतं की आता रशियाला खात्री पटली असेल की ते करार करणार आहेत आणि मला वाटतं की ते करतील. पण याबाबत आता काय होतंय ते लवकरच कळेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
‘प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो’ : डोनाल्ड ट्रम्प
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्बंधांच्या धमक्यांमुळे पुतिन यांच्या भेटीच्या निर्णयावर परिणाम झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प यांनी म्हटलं की, “प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. तसंच भारताविरुद्धच्या टॅरिफमुळे रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून त्यांना रोखलं गेलं. नक्कीच. जेव्हा तुम्ही तुमचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक गमावता, तेव्हा मला वाटतं की त्यामुळे कदाचित ही एक महत्वाची भूमिका राहिली असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचं द गार्डियनने म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची होणार भेट?
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत असून रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी पुतिन यांची ते भेट घेणार आहेत. १५ ऑगस्ट २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटीत रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी तोडगा काढण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे. पुतिन आणि ट्रम्प यां ही भेट अलास्कामध्ये होणार आहे.