Donald Trump warns Western Countries UNGA : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८० व्या सत्राला संबोधित केलं. त्यांनी यावेळी अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आणि रशियाकडून होत असलेल्या तेल खरेदीच्या मुद्द्यावर सविस्तर भाषण केलं. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच भारत व पाकिस्तानमधील युद्धासह एकूण सहा युद्ध रोखल्याचा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रावर शांतता निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आणि बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला.
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील व्यासपीठावरून भाषण करताना ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “स्थलांतरामुळे पाश्चात्य देशांवर हल्ले होत आहेत. हे देश नरकाकडे जात आहेत. दरम्यान, जगभरातील हवामान शास्त्रज्ञ वातावरणीय बदलांबाबत इशारा देत आहेत, चिंता व्यक्त करत आहेत. मात्र, ट्रम्प यांनी या चिंतेला जगावर लादलेली मोठी फसवणूक म्हटलं आहे.
“संयुक्त राष्ट्रसंघटना युद्ध थांबवण्यात अपयशी ठरली आहे”
डोनाल्ड ट्रम्प संयुक्त राष्ट्राच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “ही संघटना केवळ कडू पत्र लिहिते, मात्र स्वतः युद्ध थांबवण्यात अपयशी ठरली आहे.” यावेळी ट्रम्प यांनी यूएनच्या मुख्यालयातील खराब सरकता जिना व टेलिप्रॉम्प्टरची तक्रार देखील केली.
पाश्चात्य देशांवरील हल्ल्यांना यूएन जबाबदार : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष स्थलांतरावरून संयुक्त राष्ट्रावर हल्लाबोल करत म्हणाले, “यूएन पाश्चात्य देशांवरील हल्ल्यांना आर्थिक मदत पुरवत आहे. मला वाटतं की यूएनच्या खुल्या सीमांचं अयशस्वी धोरण आता केराच्या टोपलीत टाकलं पाहिजे. आमच्या सरकारने बायडेन प्रशासनाचे खुल्या सीमा (ओपन बॉर्डर) धोरण रद्द केलं आणि आमच्या देशात घुसलेल्या गुन्हेगारांना, घुसखोरांना परत पाठवलं.”
ट्रम्प यांची भारत व चीनवर टीका
ट्रम्प यांनी यावेळी भारत व चीनवर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून रशिया-युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले, नाटो देशांनीही रशियन ऊर्जा व इतर उत्पादनांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत. हे मला दोन आठवड्यांपूर्वी समजलं आणि यामुळे मी नाटोवर नाराज आहे.”
रशियाला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “रशियाने युद्ध थांबवण्यास नकार दिला तर अमेरिका त्यांच्यावर कठोर आयात शुल्क लादेल, ज्यामुळे हा रक्तपात लवकरच थांबेल अशी मला आशा आहे.”