Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. खरं तर ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाची (टॅरिफ) जगभरात चर्चा आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांचा जगातील अनेक देशांना फटका देखील बसला आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
दक्षिण कोरिया आणि जपानवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता दक्षिण कोरिया आणि जपानवर १ ऑगस्ट २०२५ पासून २५ टक्के कर आकारला जाणार आहे. त्यामुळे आता दक्षिण कोरिया आणि जपानमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादला जाणार असल्याने दक्षिण कोरिया आणि जपानला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसकडून या संदर्भात पत्र देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.
दरम्यान, याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट इशारा देत हे देखील सांगितलं की, जर कोणत्याही देशाने अमेरिकन वस्तूंवर स्वतःचे कर वाढवले तर अमेरिका नवीन २५ टक्के प्रत्युत्तरादाखल वाढ करेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी असंही सांगितलं की अमेरिका आणि त्यांच्यातील व्यापार तूट दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दरांपेक्षा हे दर खूपच कमी आहेत.
“…तर १० टक्के अतिरिक्त कर लागणार”, ट्रम्प यांचा BRICS देशांना इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना देखील मोठा इशारा दिला आहे. जो कोणता देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादलं जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, अशी इशारावजा धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या बरोबरच दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की अमेरिकन प्रशासन आज रात्रीपासून अनेक देशांना नवीन शुल्क नियम आणि सुधारित व्यापार करार अटींबाबत अधिकृत पत्रे पाठवण्यास सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
रशियाबरोबर कोणत्याही देशांनी व्यापार न करण्याचाही दिला होता इशारा
गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया व युक्रेनमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. जगभरातील इतर देशांनी मध्यस्थी करूनही दोन्ही देश एकमेकांवरील हल्ले थांबविण्याचं नाव घेत नाहीये. विशेष बाब म्हणजे, रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे असं म्हणत ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रशियाने त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले होते. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाबरोबर कोणत्याही देशांनी व्यापार करू नये, असा सज्जड दम ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांना दिला. तरीही, चीन व भारतासह बहुतांश देशांनी रशियामधून कच्चे तेल व ऊर्जा खरेदी करणे सुरूच ठेवले. त्यामुळे ट्रम्प यांनी रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांना धडा शिकविण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची तयारी देखील केल्याचं बोललं जात आहे.