Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क (टॅरिफ) धोरणाची जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. कारण आतापर्यंत ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं आहे. या टॅरिफचा अनेक देशांना खूप मोठा फटका बसत आहे. भारतावरही तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. एवढंच नाही तर भारत रशियाकडून खजिन तेल आयात करत असल्याच्या मुद्यांवरून भारत आणि अमेरिकेत व्यापर करारही झालेला नाही.
या सर्व घडामोडीनंतर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियन तेलाच्या ऐवजी अमेरिकी मक्यापासून बनवलेलं इथेनॉल भारतानं वापरावं यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अट्टहास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अब्जावधी रुपयांचा व्यापार करार अडकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराचा संघर्ष आणखी तीव्र झाल्याची चर्चा आहे.
दोन्ही देशांत अर्थात अमेरिका आणि भारतामधील व्यापार करार करण्यासाठी भारताने अनेक कठोर अटी पूर्ण कराव्यात अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे. एका अहवालात म्हटलं आहे की, अमेरिकेला भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी करण्याचे, संरक्षण शस्त्रे खरेदी कमी करण्याचे आणि अमेरिकेचं इथेनॉल भारताने घ्यावं याची ठोस खात्री हवी आहे.
दरम्यान, यशस्वी व्यापार करारासाठी दोन्ही देशांमधील चर्चा सुरू आहे. मात्र, यासाठी अमेरिकेच्या काही अटी असून त्या भारताने पूर्ण कराव्यात असा ट्रम्प यांचा अट्टहास आहे. यामध्ये रशियाकडून तेल खरेदीत कपातीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तसेच अमेरिका कृषी आणि दुग्धजन्य उद्योगांसह दूध आणि चीज उत्पादनांमध्ये अमेरिकन कंपन्यांना बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी आग्रही असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर २ एप्रिल रोजी परस्पर कर लादल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. मात्र, भारताने देशातील शेतकऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर व्यापार कराराची ही चर्चा पुढे गेली नाही. दरम्यान, आता नव्या माहितीनुसार मंगळवारपासून पुन्हा नव्याने व्यापार चर्चा सुरू होऊ शकते.
भारत-अमेरिका व्यापार करार का रखडला?
भारत आणि अमेरिका या दोन्ही बाजूंच्या वाटाघाटींबद्दल माहिती असलेल्या काही लोकांनी म्हटलं की, या चर्चेमुळे लवकरच एक अंतरिम व्यापार करार होईल. मात्र, अद्यापही तो दिवस उजाडला नाही. अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरही दोन्ही देश योग्य त्या निर्णयापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा पुनरुच्चार करत भारत शेतकऱ्यांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या क्षेत्रांबाबत कधीही तडजोड करणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे.