Jharkhand HC Video Viral: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता झारखंड उच्च न्यायालयात एका वकिलांनी न्यायाधीशांचा भर न्यायालयात अवमान केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या घटनेनंतर झारखंड उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने अवमान करणारे वकील महेश तिवारी यांना फौजदारी अवमान नोटीस बजावली आहे. न्यायमूर्तींशी भांडण करत असताना वकील महेश तिवारी यांनी देशातील न्यायव्यवस्था पेटली असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामागे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रकरणाचा संदर्भ असल्याचे बोलले जात आहे.

वकील राकेश किशोर यांच्याप्रमाणेच झारखंड उच्च न्यायालयातील वकील महेश तिवारी यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तरलोक सिंह चौहान यांच्या खंडपीठासमोर अवमान प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी महेश तिवारी यांना न्यायमूर्ती राजेश कुमार यांच्या बद्दल उद्गारलेल्या विधानाबाबत विचारले, तेव्हा महेश तिवारी म्हणाले की, त्यांनी केलेल्या विधानांची ते जबाबदारी घेत आहेत. त्यांनी पूर्ण शुद्धीत सदर टिप्पणी केली असल्याचे ते म्हणाले.

यानंतर खंडपीठाने तिवारी यांना फौजदारी अवमान नोटीस बजावली. त्यांना तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता ११ नोव्हेंबर रोजी होईल.

तुमची मर्यादा ओलांडू नका

सदर व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुनावणीदरम्यान वकील तिवारी न्यायमूर्तींना म्हणाले की, मी माझ्या पद्धतीने युक्तिवाद करणार. तुम्ही मला सांगू नका. तुम्हाला कुणाचाही अवमान करण्याचा अधिकार नाही. तुमची मर्यादा ओलांडू नका.

यावर न्यायमूर्ती राजेश कुमार वकील महेश तिवारी यांना नीट बोलण्याचा सल्ला देतात. मात्र तरीही तिवारी जोरजोरात बोलत राहतात. यानंतर कोर्टात काही वेळ तणावाचे वातावरण झालेले पाहायला मिळते. सर्व वकील येऊन मध्यस्थी करत असल्याचे दिसते.

वकिलांवरील कारवाई पाहण्यासाठी गर्दी

वकील महेश तिवारी यांच्यावरील कारवाई पाहण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात बरीच गर्दी जमली होती. न्यायमूर्ती राजेश कुमार यांना तिवार काय काय म्हणाले? या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात पुन्हा दाखविण्यात आला.

सदर व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये वकील महेश तिवारी आणि न्यायमूर्ती राजेश कुमार यांच्यातील वाद दिसून आला. वकील तिवारी म्हणाले, संपूर्ण देश न्यायव्यवस्थेमुळे पेटत आहे. यावेळी झारखंड राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष राजेंद्र कृष्णा यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

पाहा पूर्ण व्हिडीओ –

गुजरातमध्येही बूट फेकीच्या घटनेची पुनरावृत्ती

दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील बूट फेक प्रकरणानंतर अहमदाबाद येथील दिवाणी आणि सत्र न्यायालयात एका व्यक्तीने निर्णय दिल्यानंतर न्यायाधीशांवर बूट फेकून संताप व्यक्त केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. सदर घटना भद्रा न्यायालय परिसरात घडली.

CJI Bhushan Gavai
सर्वोच्च न्यायालयातील बूट हल्ल्याच्या घटनेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रतिक्रिया दिली.

१९९७ साली झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीने अतिरिक्त प्रधान न्यायाधीश एम. पी. पुरोहित यांच्या दिशेने आपले दोन्ही बूट फेकले. या प्रकरणात चार आरोपींवर हल्ल्याचे आरोप होते. मात्र, न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. हा निर्णय ऐकताच तक्रारदार आक्रमक झाला आणि न्यायालयातच बूट फेकण्याचा प्रकार घडला.

बूट फेकण्याच्या घटनेवर सरन्यायाधीश गवई काय म्हणाले होते?

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी कोर्ट क्रमांक १ मध्ये प्रवेश केला आणि सरन्यायाधीश बसलेल्या पीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत वकिलाचा प्रयत्न हाणून पाडला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सदर वकिलाला सुरक्षा रक्षक घेऊन जात असताना त्यांनी ‘सनातन का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’, अशी घोषणाबाजी केली.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींशी चर्चा करत असताना या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “माझ्या भावाला आणि मला त्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. माझ्यासाठी हे प्रकरण आता विस्मृतीत गेले आहे.”