Supreme Court on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण पर्वत खोऱ्यात झालेल्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सदर याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. सैन्याने मनोधैर्य खचेल, असे पाऊल उचलता कामा नये, अशा शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. अशी याचिका करण्यापूर्वी संवदेशनशीलपणे विचार करायला हवा, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
न्यायाधीश सूर्य कांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, अशी याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागले पाहिजे. देशाप्रती प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची ही वेळ आहे. भारतीय नागरिकाचे किंवा सैन्याचे मनोबल खचेल, अशी कोणतीही याचिका करू नका. सदर प्रकरणाची संवेदनशीलता पाहा.
फतेश कुमार शाहू, मोहम्मद जुनैद आणि विकी कुमार या वकिलांच्या गटाने पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. सदर याचिका फेटाळून लावत असताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. तसेच काही प्रश्नही विचारले. न्यायालयातील न्यायाधीश हे वादावर तोडगा काढण्याचा निर्णय देतात. चौकशी करणे हे आमचे काम नाही, असेही खंडपीठाने म्हटले.
जम्मू-काश्मीरच्या बाहेर शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविली जावी, अशीही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. पहलगामवरील हल्ल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या मागणीचा समाचार घेताना खंडपीठाने म्हटले की, तुम्ही करत असलेल्या विनंतीवर तुमची तरी खात्री आहे का? तुम्ही आधी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यास सांगता. ते चौकशी करू शकत नाहीत, हे आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही प्रेस कौन्सिलला निर्देश देण्यास, तसेच नुकसान भरपाईची मागणी करता आणि आता तुम्ही विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहात.
सदर याचिका मागे घेण्याची परवानगी खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिली. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील तर संबंधित उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.