scorecardresearch

RSS कडून देशातील विद्यापीठे चालविण्याचा घाट, रोहित वेमुलाच्या सहकाऱ्याचा आरोप

हैदराबाद विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा माजी नेता दोन्ता प्रशांतचा आरोप

RSS कडून देशातील विद्यापीठे चालविण्याचा घाट, रोहित वेमुलाच्या सहकाऱ्याचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशातील विद्यापीठे आणि प्रशासन चालविण्याचा घाट घातला जातो आहे. या वाईट कृत्यामुळे विद्यापीठांची प्रतिष्ठा मलिन होते. विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागते. परंतु, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता नाही. त्यांच्या या कृत्यात अभाविप व भाजपच्याही लोकांचा सहभाग आहे, असा आरोप हैदराबाद विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा माजी नेता दोंथा प्रशांत याने केला. दोंथा प्रशांत हा रोहित वेमुलाचा सहकारी होता. रोहित वेमुला प्रकरणात ज्या पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. त्यामध्ये दोंथा प्रशांत याचाही समावेश होता.
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. तो म्हणाला, अभाविपच्या माध्यमातून संघाची विचारधारा पेरण्याचे डावपेच सध्या सुरू आहेत. या अजेंड्याला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठऱवले जाते. रोहित वेमुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षेऐवजी पुन्हा विद्यापीठातच नियुक्त केले गेले. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु आप्पाराव पोडिले यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंबेडकरी विचारधारेला दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्याने केला. त्याचबरोबर संघाला स्वतःची कसलीही तात्विक बैठक नसून, केवळ हिंदूत्वाच्या नावावर गावखेड्यातील माणसाची फसवणूक केली जात असल्याचे त्याने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-04-2016 at 15:37 IST

संबंधित बातम्या