आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी होत आहे. देभभरात त्यांच्या प्रतिमाचे पूजन, शुभेच्छा संदेश या सर्व गोष्टींनी वातावरण भारावून गेले आहे. परंतु उत्तर प्रदेशातील एका शाळेत डॉ. आंबेडकर यांच्या ऐवजी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाच श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका शाळेत हा प्रकार घडला. उत्तर प्रदेशातील दोन महिला शिक्षिका नेताजींच्या प्रतिमेसमोर हात जोडून उभ्या आहेत आणि त्यांनी पाठीमागे असलेल्या फळ्यावर डॉ. भीमराव आंबेडकर १२६ वां जयंती समारोह असे देखील लिहिले आहे. म्हणजे त्यांना आंबेडकर जयंती साजरी करायची होती हे निश्चित आहे परंतु प्रतिमा मात्र नेताजींची लावली आहे.
जर शिक्षिकांनाच महापुरुष देखील ओळखता येत नसतील तर विद्यार्थ्यांना ते काय शिकवत असतील असा प्रश्न लोक विचारत आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. सर्व जण या शिक्षकांच्या ‘ज्ञानावर’ चर्चा वर करत आहेत. याआधी देखील विविध शाळांमधून आणि कार्यक्रमामधून असे प्रकार घडले आहेत.
काही दिवसांपूर्वी इंदोरच्या महापौर मालिनी गौड यांनी एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर हार घातले. एखाद्या भाजपच्याच नेत्याकडे असा प्रकार घडणे निंदनीय आहे असे काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी म्हटले होते.
याआधी, झारखंडच्या शिक्षण मंत्र्याने अब्दुल कलाम यांच्या फोटोवर हार घातला होता. त्यावेळी अब्दुल कलाम हे जिवंत होते. या घटनेनंतर एका आठवड्याने अब्दुल कलाम यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून शिक्षण मंत्री नीरा यादव यांना धक्का बसला होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोवर देखील एके ठिकाणी हार घालण्यात आल्यामुळे खळबळ माजली होती.