Greta Thunberg: स्वीडनची पर्यावरण विषयावर कार्य करणारी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणूक देण्यात आली असा आरोप इस्रायलवर करण्यात आला. ग्रेटाचे केस ओढण्यात आले, तसंच तिला बळजबरीने ग्रेटाला इस्रायलच्या झेंड्याला किस करायला लावलं गेलं. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या आणि नंतर टर्कीला पाठवण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. आमच्यासमोर हे सगळे प्रकार घडले. आम्हाला आणि ग्रेटाला जेवणही दिलं गेलं नाही, पाणीही दिलं गेलं नाही असंही या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. मात्र इस्रायलने हे आरोप फेटाळले आहेत.

हे प्रकरण नेमकं काय?

स्वीडनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ग्रेटाच्या निकटवर्तीयांना एक मेल पाठवला आहे. या मेलमध्ये असा उल्लेख करण्यात आला की परराष्ट्र मंत्रालयाचा एक अधिकारी ग्रेटाला तुरुंगात भेटायला गेला होता. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ग्रेटाला अशा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं जिथे ढेकुण होते. तिला देण्यात येणारं जेवणाचं प्रमाण आणि प्यायला देण्यात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. ग्रेटाच्या शरीरावर लाल चट्टे पडले आहेत, ढेकुण चावल्याने हे घडलेलं असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्रेटाने या अधिकाऱ्याला सांगितलं की अत्यंत घाणेरड्या फरशीवर तिला बसायला लावलं. तसंच इस्रायलचा झेंडा पकडायला लावला आणि त्याला किस करायला लावलं असं ग्रेटाने सांगितल्याचंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. द गार्डियनने हे वृत्त दिलं आहे.

एरिक सेलिकने काय सांगितलं?

तुर्कस्तानचा एक कार्यकर्ता एरसिन सेलिकने एका न्यूज एजन्सीला सांगितलं की इस्रायलच्या लोकांनी ग्रेटाचे केस ओढले आणि तिला फरफटत नेलं. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला इस्रायलच्या झेंड्याचं चुंबन घेण्यास भाग पाडलं गेलं. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी ग्रेटा आणि तिच्यासह ४३७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. हे सगळे जण ४० नावांमध्ये चालले होते. या नावांच्या समूहाचं नाव ग्लोबल सुमूद फोल्टिला असं ठेवण्यात आलं होतं. माणुसकीचा आणि मानवतेचा संदेश घेऊन हे सगळे गाझाला चालले होते. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तुरुंगात डांबण्यात आलं होतं.

इस्रायलने ग्रेटा थनबर्ग आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात का घेतले?

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, त्यांच्या नौदल दलांनी बोट ताब्यात घेतली आहे आणि ही बोट इस्रायली बंदरात ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये या मंत्रालयाने बोटीचे वर्णन ‘सेलिब्रिटींची सेल्फी यॉट’ म्हणून केले आहे.

मंत्रालयाने असेही नमूद केले आहे की, बोटीवर असणाऱ्या व्यक्तींना कोणतीही इजा झाली नसून त्यांना मूलभूत अन्न आणि पाणी पुरवण्यात आले आहे.

‘सेल्फी यॉट’मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही हानी झाली नाही. त्यांना सँडविच आणि पाणी देण्यात आले, असे मंत्रालयाने लिहिले आहे.

लाईफजॅकेट घातलेल्या आणि जहाजावर बसलेल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओही दाखवण्यात आला आहे.