Twist in Delhi Acid Attack Case : दिल्ली विद्यापीठातील एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने काल तीन जणांवर तिच्यावर ॲसिड हल्ला केल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणात वेगळे वळण मिळाले असून या तरुणीच्या वडिलांना सोमवारी बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थिनीने दिल्लीतील ज्या भागात तिच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला होता, त्या भागात मुख्य आरोपी असलेल्या शेजाऱ्यासह तिघेही उपस्थित नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुलेच्या वडिलाना शोधून काढण्यात आले आणि त्यांना एका बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्पेशल सीपी (क्राइम) रविंद्र यादव यांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने शेजाऱ्यावर अॅसिड हल्ल्यात सहभागी असल्याचा खोटा आरोप केल्याचे मान्य केले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, वडिलांनी सांगितले की त्यांची मुलगी घरातून टॉयलेट क्लीनर घेऊन गेली होती आणि तिनेच ते स्वतःच्या हातावर ओतून घेतले.
अॅसिड हल्ल्यातील आरोपी हा रविवार सकाळपासून नवी दिल्लीतील दुसऱ्या भागात होता. कॉल डिटेल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज , आणि साक्षीदारांचे जबाब यांचे विश्लेषण करून हे सिद्ध झाले आहे. तक्रारकर्त्याने हल्ल्यात वापरली गेली असे सांगितलेली मोटरसायकल देखील दिवसभर त्याच भागात होती.
नेमका प्रकार काय घडला?
पोलिसांनी असेही सांगितले की, त्या महिलेच्या शेजाऱ्याच्या पत्नीने यापूर्वी तिच्या वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि छळाची तक्रार दाखल केली होती. तिने दावा केला होता की, जेव्हा ती वायव्य दिल्लीतील त्याच्या कारखान्यात काम करत होती तेव्हा त्या व्यक्तीने कथितरित्या तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.
“महिलेने आरोप केला की २०२१ आणि २०२४ दरम्यान त्याच्या कारखान्यात काम करत असताना त्याने तिचा लैंगिक छळ केला, बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल केले. तिच्या तक्रारीनंतर एक गु्हा नोंदवण्यात आला,” असे स्पेशल सीपी यादव म्हणाले. या प्रकरणात १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी डीसीपी (नॉर्थ वेस्ट) भीष्म सिंह यांनी सांगितले की, १९ वर्षांच्या मुलीला ॲसिडने भाजल्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
किशोरवयीन तरूणीने पोलिसांना सांगितले की ती तिच्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा क्लासेससाठी जात होती तेव्हा तिच्यावर ॲसिड हल्ला झाला. “तिने सांगितेल की ती कॉलेजात एक्स्ट्रा क्लासेससाठी गेली होती. ती कॉलेजकडे चालत जात असताना तिचा शेजारी इतर दोन साथिदारांसह मोटारसायकलवरून आले. त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर ॲसिड फेकले. तिने दावा केला की चेहरा वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या दोन्ही हातांना इजा झाली. त्यानंतर तिघे घटनास्थळावरून पळून गेले असेही तिने सांगितले,” असे पोलिस म्हणाले.
पोलिसांनी सांगितले की, ॲसिड फेकल्याचा आरोप असलेले दोघे हे त्यांच्या आईबरोबर आग्रा येथे आहेत, ज्यांच्यावर कथितरित्या १९ वर्षीय मुलीच्या नातेवाईकांनी ॲसिड हल्ला केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमधून असेही स्पष्ट झाले आहे की, यापैकी कोणीही व्यक्ती हा घटनेच्या ठिकाणी नव्हता.
या दोन व्यक्तींच्या आईने माहिती दिली की त्या स्वतः २०१८ साली झालेल्या ॲसिड हल्ल्यातील पीडित आहेत, जो कथितपणे महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. त्यांनी यावेळी संपत्तीचा वाद असल्याचेही सांगितले. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, असे स्पेशल सीपी यादव म्हणाले.
पोलीस आता एफआयआरची सत्यता, तक्रारकर्त्याचे आरोप आणि आरोपींनी केलेला बचाव यांची तपासणी करत आहेत.
