नोटाबंदीनंतर देशात ‘चलन’कल्लोळाची स्थिती निर्माण झाली आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी सरकार व रिझर्व्ह बँकेकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. एटीएममध्ये रिकॅलिब्रेशन करणे, बँकातून पैसे देणे यासह विविध समस्या सोडवण्यावर सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु दुसरीकडे मात्र या संधीचा फायदा घेणारेही महाभाग दिसून येत आहेत. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठीची व्हॅनच चालकाने पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या कॅश व्हॅनमध्ये तब्बल एक कोटी ३७ लाख रूपयांची रक्कम होती. चालकानेच हा प्रकार केल्याने संबंधित एजन्सीचे धाबे दणाणले आहे. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी या एटीएममध्ये एक कोटी ३७ लाख रूपयांची रक्कम होती. चालकाने व्हॅनसह पोबारा केला. व्हॅनच्या सुरक्षेची जबाबदारी लॉजी कंपनीकडे होती. पोलिसांकडून व्हॅन चालकाचा शोध सुरू आहे.

गेल्या आठवड्यात आसाममध्ये कॅश व्हॅनवर अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी व्हॅनमधील सर्व रक्कम घेऊन पोबारा केला होता. पोलिसांनी याप्रकरणी उल्फा दहशतवाद्यांवर संशय व्यक्त केला आहे. हा हल्ला तिनसुकिया येथे झाला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले होते. व्हॅन जात असताना दोन अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. येथील चहा मळ्यातील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी या व्हॅनमधून रोख रक्कम नेली जात होती, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. जंगलातून जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. अभिजीत पॉल असे मृत व्यक्तीचे नाव होते.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २ हजार रूपये करण्यात आली आहे. एटीएमसमोर मोठ्याप्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. नव्या नोटा बँकांपर्यंत लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बँक आणि कॅश व्हॅन लुटली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.