India Pakistan Tension : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून आगळीक करत भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, या ड्रोन हल्ल्याला भारत देखील चोख प्रत्युत्तर देत आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते राजस्थानमधील बारमेरपर्यंत विविध ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून हे हल्ले रोखले जात आहेत. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरील अनेक शहरांमधील लष्करी छावण्यांना लक्ष्य करणारे ड्रोनचे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. भारतीय लष्कराच्या हवाई दलाने अनेक पाकिस्तानी ड्रोन अडवून पाडले आहेत. तसेच पंजाबमधील फिरोजपूरमधील नागरी भागातील एका घरावर एक सशस्त्र ड्रोन पडला आहे. या घटनेत एका कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

२६ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन हल्ले

भारतीय लष्कराने सांगितलं की, आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते गुजरातमधील भुजपर्यंत अशा २६ ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, कुआर बेट आणि लाखी नाला या ठिकाणांचा सहभाग होता.

दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे संभाव्य धोका निर्माण झाल्याचे लष्कराने म्हटलं आहे. सशस्त्र दलांनी याबाबत योग्य ती काळजी घेतली असून सर्व भारतीय सशस्त्र दल अलर्ट आहेत. तसेच ड्रोन-विरोधी प्रणालींचा वापर करून पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे. तसेच सध्या घडणाऱ्या सर्व घडामोडींवर भारतीय लष्कर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिकांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक हालचाली मर्यादित करण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घाबरून जाण्याची गरज नसली तरी अधिक दक्षता आणि खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं लष्कराने म्हटले आहे.

काश्मीरमध्ये श्रीनगर विमानतळासह अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज

काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी रात्री ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. यावेळी श्रीनगर विमानतळासह अनेक ठिकाणी सायरन आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती सांगितली जात आहे. काश्मीर खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागात शुक्रवारी रात्री पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानी ड्रोनला रोखण्यात आलं. यावेळी अनेक स्फोटांचे आवाज वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू आले.