दिल्ली कारागृह विभागाअंतर्गत येणाऱ्या काही तुरुंगात अलीकडेच कैद्यांकडे ड्रग्स आणि अवैध सीम कार्ड आढळले होते. असा प्रकार रोखण्यासाठी आता कारागृहांमध्ये अतिरिक्त सुरक्षा म्हणून श्वान पथक तैनात केलं जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं मंगळवारी दिली. श्वानांना ड्रग्स, मोबाईल फोन, शस्त्रे आणि सिमकार्ड शोधण्यासाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे. कैद्यांकडून कारागृहात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कारागृहाचे अधिकारी स्वतःचे श्वान पथक तयार करणार असून त्यांना CRPF, ITBP, BSF आणि दिल्ली पोलीस केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे कारागृहात सुरू असलेल्या काळ्या कृत्यांना रोखण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

दिल्ली कारागृहाचे महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, “आम्ही ४ श्वानांसह श्वान पथक सुरू करण्याचा विचार करत आहोत. आधी श्वानाची पिल्लं खरेदी केली जातील, त्यानंतर त्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. आमच्याकडे दोन श्वान हँडलर देखील असतील. संबंधित श्वान प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना तुरुंगात अतिरिक्त सुरक्षा म्हणून तैनात केलं जाईल,” असंही ते म्हणाले.

दिल्ली कारागृह विभागाअंतर्गत तिहार, रोहिणी आणि मंडोली असे तीन तुरुंग येतात. संबंधित तुरुंगात अलीकडच्या काळात कैद्यांकडे ड्रग्स, सिमकार्ड, मोबाईल फोन आणि इतर अवैध वस्तू आढळल्या आहेत. दुसरीकडे, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे सदस्य, कारागृहातून फोन आणि विविध सिमकार्ड वापरून खंडणीचं रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं होतं. इतर तुरुंगातील गुंड आणि कैदीदेखील ड्रग्स आणि सिमकार्ड लपवण्यासाठी कपडे किंवा अन्नाचा वापर करतात.

हेही वाचा- “…ही हुकूमशाहीची सुरुवात नाही, टोक आहे”, ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

तिहार कारागृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, “ते कारागृहात नियमित तपासणी करतात परंतु कैदी ड्रग्स आणि सिम कार्डची तस्करी करू शकतात. असा ऐवज कैद्यांनी आम्हाला माहीत नसलेल्या ठिकाणी लपवून ठेवला असावा किंवा ते तुरुंगाच्या रक्षकांची दिशाभूल करत असतील, असा आम्हाला संशय आहे. आमच्याकडे स्कॅनर आणि चेकर्स देखील आहेत, परंतु ते कपड्यांमध्ये किंवा अन्नामध्ये लपवलेल्या लहान वस्तू शोधण्यात अपयशी ठरू शकतात.” त्यामुळे आता कारागृहात श्वान पथक तैनात करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे.