मोबाईलचा सातत्याने केला जाणारा वापर आरोग्यासाठी कसा हानीकारक ठरू शकतो, याबाबत अनेक वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. दैनंदिन आयुष्यातही मोबाईलमध्ये बघताना इतर कोणतीही कृती करणं कधीकधी भयंकर परिणाम घडवू शकतं, अशीही अनेक उदाहरणं समोर आली आहेत. तसाच काहीसा प्रकार मथुरा रेल्वे अपघाताबाबत घडला असून पायलट कॅबिनमधील सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मोबाईल फोनमुळे हा अपघात झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे!

मथुरा रेल्वे अपघाताची पार्श्वभूमी…

दोन दिवसांपूर्वी, अर्थात मंगळवारी मथुरा रेल्वे स्थानकावर एक अपघात झाला. रात्री अकराच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर उभी असणारी दिल्ली-मथुरा इएमयू प्रवासी ट्रेन अचानक प्लॅटफॉर्मचं शेवटचं टोक तोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, ट्रेन तिथेच थांबल्यामुळे पुढील भीषण अनर्थ टळला. या प्रकरणात रेल्वे विभागानं तातडीनं तपास सुरू केला.

पायलट केबिनमधल्या घडामोडी!

दरम्यान, एकीकडे ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढत असताना पायलट केबिनमध्ये वेगळंच चित्र दिसून आलं. पायलट केबिनमधल्या सीसीटीव्ही फूटेजमधून अपघात घडला तेव्हा नेमकं पायलट केबिनमध्ये काय घडलं, याचं सत्य समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत असून त्यानंतर रेल्वे विभागानं पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव कारनं उडवलं अन्…; थरकाप उडवणारी घटना समोर

ट्रेन फलाटावर लागल्यानंतर ट्रेनमध्ये असणारे लोको पायलट गोविंद हरी शर्मा हे केबिनमधून बाहेर पडले. त्यानंतर काही सेकंदांत सचिन नावाचा कर्मचारी केबिनमध्ये आला. केबिनमध्ये शिरतानाच सचिनच्या हातात मोबाईल फोन होता. तो व्हिडिओ कॉलवर कुणाशीतरी बोलत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पायलट केबिनमध्ये आल्यानंतर सचिननं पायलट सीटच्या मागच्या बाजूला काहीतरी हालचाल केली. केबिनचा दरवाजा लावला आणि तो सरळ पायलट चेअरवर बसण्यासाठी गेला. या पूर्ण वेळेत तो मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलतच होता.

बॅग थ्रोटलवर ठेवली आणि…

मोबाईलवर बोलता बोलताच सचिननं आपली बॅग थेट समोरच्या थ्रोटलवर ठेवली. ट्रेन चालवण्यासाठी हे थ्रोटल महत्त्वाचं असतं. बॅग थ्रोटलवर ठेवताच ट्रेन पुढे सरकू लागली. ट्रेननं वेग पकडला आणि थेट समोर प्लॅटफॉर्मवर चढली. सचिनला काय घडलंय याचा अंदाज येताच त्यानं इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि ट्रेन जागीच थांबली. हे सगळ झाल्यानंतर सचिननं मोबाईलवर चालू असणारा व्हिडिओ कॉल बंद केला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलंबन आणि आरोप-प्रत्यारोप

दरम्यान, हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तपासाअंती रेल्वे प्रशासनानं कर्मचारी सचिन, लोको पायलट गोविंद हरीसह इतर तीन जणांना निलंबित केलं आहे. सचिनचं म्हणणं आहे की इंजिनिअरनं लोको पायलटकडून त्याला ट्रेनची चावी आणण्यासाठी पाठवलं होतं. लोको पायलटला विचारलं असता त्यानं चावी आतच असल्याचं सांगितलं. पण लोको पायलटनं चावी ऑनच ठेवल्यामुळे हा प्रकार घडला! पण लोको पायलटचं म्हणणं आहे की त्यानं केबिनच्या बाहेर आल्यावर सचिनला चावी दिली. या आरोप-प्रत्यारोपांची आता रेल्वे प्रशासनाकडून चौकशी चालू आहे.