यूट्यूबर्स नवनव्या गोष्टींच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतात. अनेक यूट्यूबर्स इतर देशांतही भ्रमंती करून तिथल्या अनेक गोष्टी व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणत असतात. भारतातही वेगवेगळ्या भागांत असे यूट्यूबर्स प्रवास करताना दिसतात. मात्र, अशाच एका यूट्यूबरशी बंगळुरूच्या चिकपेट मार्केटमध्ये एका दुकानदारानं गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे ही घटनाही रेकॉर्ड झाली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
गैरवर्तन करणाऱ्या दुकानदाराला अटक
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. रविवारी दुपारच्या सुमारास बंगळुरूमधल्या चिकपेट मार्केटमध्ये ही घटना घडली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तातडीने पावलं उचलत संबंधित दुकानदाराला लागलीच अटक केली आहे. सोमवारी दुपारी या दुकानदाराला अटक झाली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
नेमकं घडलं काय
यूट्यूबर पेट्रो मोटानं हा व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. चिकपेट मार्केटमधलं वातावरण आणि तिथल्या काही गोष्टी शूट करत असताना तिथल्याच एका दुकानदारानं या यूट्यूबरचा हात पकडला. युट्यूबरनं त्या दुकानदाराला नमस्कार केल्यानंतरही त्यानं अरेरावी सुरूच ठेवली. “हे काय आहे, काय चाललंय?” असं म्हणत या दुकानदारानं अरेरावी करायला सुरुवात केली. यूट्यूबरनं आपला हात सोडण्याची विनंती केल्यानंतरही या दुकानदारानं हात न सोडता अरेरावी सुरूच ठेवली. अखेर पेट्रो मोटानं बळजबरीनं तिथून काढता पाय घेतला आणि बाहेरची वाट धरली.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “या प्रकाराची पोलिसांनी दखल घेतली असून संबंधित पोलीस स्थानकाला त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यावर सविस्तर चौकशी केली जाईल”, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी, अर्थात सोमवारी या दुकानदाराला अटक करण्यात आली.