बिहार हे राज्य अनेक पुरोगामी आंदोलनांचे केंद्र राहिले आहे, पण राजकारणातील घराणेशाहीच्या बाबतीत देखील या राज्याचा क्रमांक अव्वल मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, सध्याच्या २४३-सदस्यांच्या विधानसभेत घराणेशाहीचा दबदबा राहिला आहे. बिहारच्या विधानसभेत घराणेशाहीने पोहचलेल्या नेत्यांची संख्या ७० (म्हणजेच २८.८१ टक्के) आहे, जी एकूण संख्येच्या एक-चतुर्थांशापेक्षाही अधिक आहे.

आरजेडीमधील ४२ टक्के आमदार हे घराणेशाहीतून आलेले

लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी (RJD) पक्षाच्या ७१ आमदारांपैकी ३० आमदार हे राजकीय घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत, म्हणजेच आरजेडीच्या एकूण ४२.२५ टक्के आमदार घराणेशाहीतून आलेले आहेत. तर जेडीयूच्या ४४ आमदारांपैकी १६ आमदार असे आहेत, म्हणजेच जेडीयूच्या ३६.३६ टक्के आमदारांना घराणेशाहीमुळे संधी मिळालेली आहे. तर भाजपामध्ये हा आकडा काहीसा कमी आहे. भाजपाकडे असलेल्या ८० पैकी १७ आमदार म्हणजेच २१.२५ टक्के आमदार हे घराणेशाहीचा भाग आहेत. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या १७ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत.

नीतीश कुमार यांच्यासह बिहारच्या २३ मुख्यमंत्र्यांपैकी किमान सात मुख्यमंत्र्यांचा राजकीय वारसा सध्या लवकरच विसर्जित होणाऱ्या विधानसभेत त्यांच्या कुटुंबीय सदस्यांनी आणि नातेवाईकांनी पुढे चालवला आहे. यामध्ये लालू प्रसाद-राबडी देवी यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव, तसेच केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांची सून दीपा मांझी यांचा समावेश आहे. यादीत भाजपाचे दोन मंत्री नीतीश मिश्रा आणि अमरेंद्र प्रताप सिंग यांचा देखील समावेश आहे, जे अनुक्रमे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा आणि हरिहर सिंग यांचे पुत्र आहेत.

सध्याच्या विधानसभेत घराणेशाहीतून आलेले मंत्री

सध्याच्या विधानसभेत घराणेशाहीतून आलेल्या नेत्यांच्या यादीत जेडीयू-भाजपा राज्य सरकारमधील इतर सात मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये विजय कुमार चौधरी (जेडीयू), नितीन नवीन (भाजपा), महेश्वर हजारी (जेडीयू), शीला कुमारी (जेडीयू), सुमित कुमार सिंग (जेडीयू), सुनील कुमार (जेडीयू) आणि जयंत राज (जेडीयू) यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्ये जवळजवळ ५७ आमदार हे दुसऱ्या पिढीचे आहेत आणि तीन आमदार तिसऱ्या पिढीतील आहेत.

राजकारणात तिसरी पिढी असलेले नेते देखील विधानसभेत आहेत. जेडीयूचे मंत्री सुमित कुमार सिंह यांच्या वडील आणि आजोबा आमदार आणि मंत्री होते. सुदर्शन कुमार जेडीयूचे आमदार आहेत आणि त्यांचे आई-वडील आणि आजोबा आमदार होते. आरजेडीचे यूसुफ सलाहुद्दीन यांचे वडील महबूब अली कैसर खासदार होते आणि आजोबा चौधरी सलाहुद्दीन मंत्री होते. फक्त विधानसभाच नाही विधान परिषदेतही घराणेशाहीचे वर्चस्व पाहायला मिळते, येथे राबडी देवी यांच्यासह एकूण १२ प्रतिनिधी आहेत.

सम्राट चौधरी यांचे वडीलही मोठे नेते

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी हे शकुनि चौधरी यांचे पुत्र आहेत, जे समता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. हिन्दुस्तानी अवाम मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन मंत्री आहेत. इतर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री भागवत झा आजाद यांचे पुत्र राजवर्धन आजाद आणि जेडीयूचे मंत्री अशोक चौधरी यांचा समावेश आहे, जे माजी मंत्री महावीर चौधरी यांचे पुत्र आहेत.