आज (२३ नोव्हेंबर) जगभरात ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यासह अरुणाचल प्रदेश आणि टर्की देशात भूंकप धक्क्यांची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील भूकंप धक्क्यात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र अरुणाचल प्रदेश आणि टर्की येथील भूकंप धक्क्यांमुळे झालेल्या हानीबद्दल निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. पालघरमधील भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल आहे.

अरुणाचल प्रदेशमधील बासरमध्ये भूकंपाचे धक्के

अरुणाचल प्रदेशमधील बासर भागापासून ५८ किमीवर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती. या घटनेतील हानीबाबात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र जमिनीच्या १० किमी खाली होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : भूकंप दरवर्षी का होतात? त्यामागचं वैज्ञानिक कारण काय?

टर्कीमध्ये ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

टर्की देशातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. टर्कीची राजधानी असलेल्या अंकारा शहरापासून जवळपास १८६ किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केल असून पहाटे ६.३८ वाजता हे भूकंप धक्के बसले.

पालघरमध्ये पहाटे चार वाजता भूकंपाचे धक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज (२३ नोव्हेंबर) पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. सन २०१८ साला पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा अधिक असणाऱ्या धक्क्यांची संख्या मोजकी आहे.