हैदराबाद : तेलंगणामधील चेन्नूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विवेक वेंकटस्वामी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी कारवाई केली. वेंकटस्वामी यांच्यासह अन्य काही व्यक्तींशी संबंधित ठिकाणांवर ईडीने शोध कारवाई केली. हवालाशी संबंधित परकीय चलन विनिमयासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी केली जात असल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

चेन्नूर आणि हैदराबाद येथे परकीय चलन विनिमय कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई केल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना ईडीने ही कारवाई केली आहे. राज्यातील ११९ मतदारसंघांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अलीकडेच आठ कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार करण्यात आला होता आणि ते वेंकटस्वामी प्रवर्तक असलेल्या कंपनीशी संबंधित असल्याचा ईडीचा संशय आहे. सर्वात आधी तेलंगणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ईडीने कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ‘बायजू’ला ‘ईडी’ची ९,३०० कोटींची नोटीस; ‘फेमा’च्या उल्लंघन प्रकरणी कारवाई

काँग्रेसला २०पेक्षा कमी जागा मिळतील!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हैदराबाद : तेलगंणात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला २०पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी केला. गेल्या वेळपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून आपला बीआरएस पक्ष सत्तेवर परत येईल असे ते मधिरा येथील प्रचारसभेत बोलताना म्हणाले. यावेळी काँग्रेसवर टीका करताना राव म्हणाले की, त्यांच्या पक्षात मुख्यमंत्रीपदाचे डझनभर उमेदवार आहेत. ते जिंकणार नाहीत, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. त्यांना वीस किंवा त्यापेक्षाही कमी जागा मिळतील. मी सर्व मतदारसंघांचा दौरा केला तर काँग्रेसला तितक्याही जागा मिळणार नाहीत असे ते म्हणाले. माझा प्रचार पुढे सरकत आहे तसा काँग्रेसचा पराभव होत आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेस लोकांना फसवण्याचे राजकारण करते असा आरोपही केसीआर यांनी केला.