पीटीआय, नवी दिल्ली
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती उद्याोजक रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. हरियाणाच्या शिकोहपूरमधील जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. वढेरा यांच्याविरुद्ध एखाद्या फौजदारी खटल्यात ईडीने तक्रार दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ईडीने वढेरा आणि त्यांच्याशी संबंधित स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांशी संबंधित ३७.६४ कोटी रुपयांच्या ४३ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (पीएमएलए) बुधवारी ईडीने तात्पुरते जप्तीचे आदेश जारी केले होते. ‘पीएमएलए’मधील तरतुदींनुसार येथील ‘राऊस अव्हेन्यू’ न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे सूत्रांनी ‘पीटीआय’ला सांगितले. वढेरा, त्यांच्याशी संबंधित स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी, सत्यानंद याजी आणि केवल सिंग विर्क, त्यांची कंपनी ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर काही कंपन्यांसह एकूण ११ संस्थांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने अद्याप फिर्यादींच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. वढेरा यांनी या सर्व आरोपांचे यापूर्वी अनेकदा खंडन केले आहे. ‘राजकीय सूडबुद्धीने’ ही कारवाई होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर ईडीने आरोपपत्रात दावा केला की, वढेरा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. आरोपपत्रात समावेश केलेल्या मालमत्तांच्या जप्तीची मागणीही ईडीने केली आहे. या प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून एप्रिलमध्ये ईडीने वढेरा यांची सलग तीन दिवस चौकशी केली होती. ईडी वढेरा यांची आर्थिक गैरव्यवहाराच्या इतर दोन प्रकरणांमध्ये चौकशी करत आहे, ज्यात ब्रिटनस्थित शस्त्रास्त्र सल्लागार आणि फरार गुन्हेगार संजय भंडारी यांच्याशी संबंधित आणि राजस्थानमधील बिकानेरमधील जमीन व्यवहार यांचा समावेश आहे.
प्रकरण काय?
१) सप्टेंबर २०१८ मध्ये गुरुग्राम पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’नंतर आर्थिक गैरव्यवहाराचा हा खटला सुरू झाला आहे. या ‘एफआयआर’मध्ये वढेरा यांनी त्यांच्या ‘स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत १२ फेब्रुवारी २००८ रोजी ‘ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’कडून ७.५ कोटी रुपयांच्या खोट्या घोषणापत्राद्वारे सेक्टर ८३ (गुरुग्राम) मधील शिकोहपूर गावात ३.५३ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे.
२) रॉबर्ट वढेरा यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रभावाने या जमिनीवर व्यावसायिक परवानाही मिळवला होता, असाही आरोप आहे. त्यावेळी भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होते. चार वर्षांनंतर, सप्टेंबर २०१२ मध्ये स्काय लाइट कंपनीने ही जमीन रिअॅलिटी क्षेत्रातील प्रमुख ‘डीएलएफ’ला ५८ कोटी रुपयांना विक्री केली.
३) ऑक्टोबर २०१२ मध्ये हरियाणाच्या भू-एकत्रीकरण आणि भूमी अभिलेख महासंचालक-सह-निरीक्षक-जनरल नोंदणी म्हणून कार्यरत असलेले ‘आयएएस’ अधिकारी अशोक खेमका यांनी या व्यवहाराने राज्य एकीकरण कायदा आणि काही संबंधित प्रक्रियांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवल्यानंतर हा जमीन व्यवहार वादात सापडला.