पीटीआय, नवी दिल्ली
पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्यास जशास तसे प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील तब्बल आठ लष्करी ठिकाणे शनिवारी लक्ष्य केली. यामध्ये पाकिस्तानी लष्कर तसेच हवाई दलाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती असून त्यामुळेच अखेर तेथील सरकार आणि सैन्याला शस्त्रसंधीसाठी प्रस्ताव द्यावा लागल्याची चर्चा आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ लष्करी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू केले आणि त्याच वेळी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानमधील शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले सुरू केले. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कृतीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे भारताने याआधीच जाहीर केले होते. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा सीमावर्ती शहरांमध्ये हल्ले झाल्यानंतर शनिवारी सकाळी भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील आठ लष्करी तळांवर तुफानी हल्ला चढविला. सकाळी ११ वाजता पत्रपरिषदेत परराष्ट्रमंत्री विक्रम मिस्राी यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या कारवाईची माहिती दिली.
पाकिस्तानी सैन्यदलांचे रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कूर आणि चुनैन या तळांवर हवेतून क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे यातील चकलाला हा तळ लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्ये असून हा धक्का पाकिस्तानसाठी मोठा असल्याचे मानले जात आहे. याबरोबरच पसरूर आणि सियालकोट येथील रडार यंत्रणाही पूर्णपणे निकामी करण्यात भारतीय सैन्यदलांना यश आल्याचे कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंह यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यांनी पाकिस्तानच्या स्वसंरक्षण तसेच हल्ल्यांच्या क्षमतेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पाच महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील किमान १०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामध्ये भारतातील मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पाच महत्त्वाच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे.
● मुदस्सर खादियां खस ऊर्फ मुदस्सर ऊर्फ अबू जुंदाल हा लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मुरिदकेमधील मरकज तय्यबातील कारवायांचे व्यवस्थापन करत असे. त्याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानच्या सैन्याने लष्करी मानवंदना दिली आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पुष्पहार अर्पण केला. तर, जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज अब्दुल रौफने त्याच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना सरकारी शाळेत आयोजित केली, त्या वेळी वरिष्ठ लष्करी आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहिले.
● हाफिज मुहम्मद जमील हा जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा दहशतवादी आणि मौलाना मसूद अझहरचा नातेवाईक (मोठा मेहुणा) होता. बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाहच्या कारभारावर देखरेख करणे हे त्याचे प्रमुख काम होते. त्याशिवाय तरुणांना कट्टरवादाकडे वळवणे आणि जैशचे आर्थिक व्यवहार पाहणे ही तितकीच महत्त्वाची कामेही त्याच्याकडे होती.
● मोहम्मद युसुफ अझर ऊर्फ उस्ताद जी ऊर्फ मोहम्मद सलीम ऊर्फ घोसी साहब हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादीही मसूद अझहरचा मेहुणा होता. त्याच्याकडे ‘जैश’च्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. जम्मू-काश्मीरमघील विविध दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता. त्याशिवाय कंदाहारला जाणाऱ्या आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणात तो संशयित होता.
● लष्कर-ए-तय्यबाचा खालिद ऊर्फ अबू आकाशा यानेही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्या. तसेच तो अफगाणिस्तानातील शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सहभागी होता. फैसलाबादमध्ये त्याचा अंत्यसंस्कार झाला तेव्हा पाकिस्तानचे अनेक वरिष्ठ लष्करी आणि नागरी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
● जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद हसन खान हा दहशतवादी जैशच्या पाकव्याप्त काश्मीरमधील कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांच्या नियोजनात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याच्या कुटुंबीयांचे दहशतवाद्यांशी संबंध
पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्या कुटुंबीयांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. चौधरी यांचे वडील अणुशास्त्रज्ञ होते आणि ते अल-कायदाशी संबंधित होते. त्यांनी अल-कायदाला महत्त्वाची माहिती आणि तांत्रिक कौशल्य पुरवल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्रे आणि अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध घातले होते अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी उघड केली. भारताने ऑपेरशन सिंदूर सुरू केल्यापासून लेफ्टनंट जनरल चौधरी हे माध्यमांना पाकिस्तानतर्फे माहिती देत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या कागदपत्रांनुसार, त्यांचे वडील सुलतान बशीरुद्दीन महमूद पाकिस्तानच्या अणुऊर्जा आयोगामध्ये कार्यरत होते. ते अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन यालाही भेटल्याची माहिती आहे. त्यांनी अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तसेच अण्वस्त्रांशी संबंधित परिणामांची माहिती अल-कायदाला दिली होती. त्याबरोबरच सुलतान बशीरुद्दीन महमूद यांच्यावर ‘उम्माह तमीर-ए-नौ’ या मूलतत्त्ववादी संघटनेसाठी निधी उभारण्याचा आरोप होता. ही संघटना अफगाणिस्तानात १९९९मध्ये स्थापन करण्यात आली होती.
महमूद यांनी धर्म आणि विज्ञानाची सांगड घालणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अमृतसरमध्ये जन्मलेले महमूद सध्या ८५ वर्षांचे असून इस्लामाबादमध्ये स्थायिक आहेत.