Eknath Shinde : शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांच्याकडून मला मिळालेला पुरस्कार हा वेगळा आहे. विचारधारा वेगळी असली तरीही वैयक्तिक संबंध हे प्रत्येकाने टिकवायचे असतात. राजकारणातही मी एक पातळी सोडून कधीही कुणावर टीका केली नाही. राजकारणात अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत. मी आरोपांना कामांतून उत्तर देत गेलो. हे संस्कार माझ्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहेत. अडीच वर्षांत मला चांगली कामगिरी करता आली. मी मुख्यमंत्री झालो तेव्हाच मला माहीत होतं की आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं करायचं असं मी ठरवलं होतं असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राजकारण्यांना फारसे पुरस्कार दिले जात नाहीत-एकनाथ शिंदे

पुरस्कार, सन्मान हे विचारवंत, साहित्यिकांसाठी असतात. राजकारण्यांना कमी दिले जातात. आज मिळालेला पुरस्कार स्वीकारताना थोडा संकोच होता. मात्र प्रेमही होतं. मला पुरस्कार प्रदान केलात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे याची जाणीवही मला आहे. चांगलं काम करण्याचा हुरुप येतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही-शिंदे

शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्याच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. महादजी शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यातील कणेर खेड हे आहे. या लढवय्याच्या भूमित माझा जन्म झाला आहे हे मी माझं भाग्य समजतो. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे, पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीही देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे एकत्र आले. सदू शिंदे हे भारताचे गुगली बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. शरद पवारांची गुगलीही अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांना गुगली टाकतात. त्यांनी आजवर मला गुगली टाकलेली नाही यापुढेही टाकणार नाहीत असा विश्वास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादजी शिंदेंबाबत एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार

महादजी शिंदे हे आभाळाएवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंधर होते. आदर्श शासक होते, कुशल योद्धे होते आणि खऱ्या अर्थाने महानायक होते. पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी स्थिती तेव्हा निर्माण झाली होती. कुठेही आशेचा किरण नव्हता. अशा परिस्थितीत महादजी शिंदेंनी पराक्रम गाजवून दिल्ली जिंकली आणि भगवा फडकवला हा इतिहास आहे. १० फेब्रुवारीला म्हणजे कालच या पराक्रमाला २५४ वर्षे पूर्ण झाली असंही एकनाथ शिंदे म्हणाले.