Election Commission on Rahul Gandhi’s Allegations : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (५ नोव्हेंबर) दिल्लीतल्या इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी H Files अर्थात हरियाणा फाईल्स नावाने मतचोरीचे कथित पुरावे सादर केले. हरियाणामध्ये २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले, “हरियाणातल्या एका बूथवर एका महिलेचं नाव २२३ वेळा होतं. या महिलेने कितीवेळा मतदान केलं? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. फेक फोटो असलेले १ लाख २४ हजार १७७ मतदार होते. तसेच ब्राझीलच्या महिलेने हरियाणात २२ वेळा मतदान केलं, ही कोण आहे? हे देखील संगावं.”

राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर तातडीने प्रत्युत्तर दिलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. आयोगाने म्हटलं आहे की “राहुल गांधींनी याविरोधात कुठलीही याचिका दाखल केलेली नाही. तसेच काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सनी कोणताही दावा किंवा आक्षेप का घेतला नाही?”

निवडणूक आयोगाचं राहुल गांधींच्या आरोपांवर ताबडतोब उत्तर

निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला आहे की “राजकीय पक्षांकडून मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अनियमिततांची सूचना देण्यासाठी नेमलेल्या बूथ लेव्हल एजंट्सनी पडताळणीदरम्यान कोणताही विरोध का दर्शवला नाही. मतदार यादीत अनेक नावं समाविष्ट करताना पडताळणी केली जाते. त्यावेळी काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सनी आक्षेप का घेतला नाही?

ब्राझिलियन मॉडेलचं नाव हरियाणाच्या मतदार यादीत कसं काय?

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदार यादीचे काही फोटो दाखवले. ज्यामध्ये एका तरुणीची वेगवेगळ्या नावांसह नोंद आहे मात्र फोटो सगळीकडे सारखाच आहे. ते म्हणाले, “या तरुणीने वेगवेगळ्या नावांसह २२ ठिकाणी मतदान केलं आहे. या तरुणीने सीमा, संगीता, सरस्वती, विलम्मा अशी नावं वापरुन मतदान केलं आहे. ही एक ब्राझिलियन मॉडेल असून तिचं नाव हरियाणाच्या मतदार यादीत कसं काय? हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. मात्र २५ लाख मतांची चोरी झाली आहे. याचाच अर्थ आठ पैकी एक मतदार हा बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला.”