गुजरात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अखेर आज शमला. दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आयोगाने म्हटले की, बुधवारी रात्री काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आपल्या आरोपांसह निवडणूक आयोगाकडे आले होते. त्यानंतर आयोगाने यावर कारवाई करीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सोपवण्यास सांगितले होते. या प्रकरणी आलेल्या तक्रारींवर अजूनही चौकशी सुरु असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पाणबुडी उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याबद्दलचे एक प्रकरण आचारसंहितेच्या उल्लंघनाशी निगडित असल्याचे निवडणूक आयोगाने यावेळी सांगितले. हे प्रकरण अद्याप एमसीसीच्या अखत्यारित असून यासाठी आयोगाकडून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या मुद्द्यांवर भाजपचे एक शिष्टमंडळ गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी आयोगाकडे आले होते. मात्र, यावर आयोगाकडून चौकशी केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.


दरम्यान, नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एका मुलाखतीमुळे आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, राहुल गांधींविरोधात याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही. त्यांना केवळ एक नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर उत्तर देण्यासाठी त्यांना पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission sought report on violation of code of conduct in gujrat assembly election
First published on: 14-12-2017 at 20:50 IST