पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडप्रक्रियेस रविवारी सुरुवात झाली. २० सप्टेंबपर्यंत ही निवडप्रक्रिया कुठल्याही स्थितीत पूर्ण करणार, असा निर्धार पक्षाच्या निवडणूक यंत्रणेने व्यक्त केला.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले, की पक्षाध्यक्ष निवडणुकीची अंतिम तारीख काँग्रेस कार्य समिती (सीडब्ल्यूसी) निश्चित करेल. २० सप्टेंबपर्यंत कोणत्याही दिवशी ही निवड करण्यात येईल.

‘सीडब्ल्यूसी’ने १६ एप्रिल ते ३१ मे २०२२ दरम्यान ब्लॉक समिती आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांची निवडणूक, जिल्हा समिती अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड १ जून ते २० जुलैदरम्यान व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्यांची निवडणूक २१ जुलैपासून २० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला होता. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) अध्यक्षांची निवड २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान होईल.

मिस्त्री यांनी निर्धार व्यक्त करताना सांगितले, की या निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. आम्ही पक्षनेतृत्वाला हा निवडणूक कार्यक्रम पाठवला आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीची अंतिम तारीख ‘सीडब्ल्यूसी’ निश्चित करणार आहे. त्याची आता प्रतीक्षा सुरू आहे. ब्लॉक, जिल्हा, प्रदेश काँग्रेस समिती स्तरावर संघटनात्मक निवडणुका झाल्या आहेत का, असे विचारल्यावर मिस्त्री यांनी सांगितले, की या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘एआयसीसी’ प्रतिनिधींच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे प्रतिनिधी पक्षाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मतदान करतील. ‘सीडब्ल्यूसी’ ही अंतिम तारीख जाहीर करेल. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते २० सप्टेंबपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड पूर्ण होईल.

जी-२३चे लक्ष : दरम्यान, काँग्रेसमधील ‘जी-२३’ गट या निवडणूक प्रक्रिया आणि त्याच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवेल. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपेंद्रसिंह हुड्डा आणि मनीष तिवारींसह ‘जी-२३’ गटातील नेत्यांनी ‘सीडब्ल्यूसी’पासून ब्लॉक स्तरापर्यंतच्या निवडणुका योग्य रीत्या घेण्याचा आग्रह धरला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of new congress president by 20 september zws
First published on: 22-08-2022 at 04:47 IST