बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कामगार नेत्या सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्यासह पाच जणांवरील कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोमिला थापर, प्रभात पटनाईक, सतीश देशपांडे आणि अन्य मंडळींनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर दुपारी साडे तीनच्या सुमारास सुनावणी होणार आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन,  अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या सर्वांच्या ईमेलची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांना अटक केली. या सर्वांचाही नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. या अटकेचा निषेध होत असून या अटकसत्रात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात होती.

सुधा भारद्वाज या कामगार नेत्या असून गौतम नवलाखा हे ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकली’चे सल्लागार संपादक आहेत. वरवरा राव हे तेलंगणमधील प्रख्यात कवी आहेत. या पाच जणांच्या अटकेविरोधात बुधवारी सकाळी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पाच जणांवरील अटकेच्या कारवाईला स्थगिती देऊन महाराष्ट्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विचारवंतांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.