Elon Musk claims Netflix Shows Pro Trans Content : वेगवेगळी वक्तव्ये आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट्समुळे नेहमी चर्चेत राहणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी आता नेटफ्लिक्सवर निशाणा साधला आहे. त्यांनी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द केलं असल्याची माहिती समाजमाध्यमांवरून दिली आहे. पाठोपाठ लोकांनाही आवाहन केलं आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षितेतेसाठी, आरोग्यासाठी नेटफ्लिक्स अनसब्सक्राइब करा. अमेरिकन ऊर्जा विभागातील माजी अणू संशोधक व प्रसिद्ध छायाचित्रकार मॅट व्हॅन स्वॉल यांनी एक्सवर एक पोस्ट केली की त्यांनी नेटफ्लिक्स अनसब्सक्राइब केलं आहे. त्यावर मस्क म्हणाले, ‘मीसुद्धा’.
मॅट व्हॅन स्वॉल यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितलं की त्यांनी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द केलं आहे. ही पोस्ट रिपोस्ट करत मस्क यांनी देखील सहमती दरशवली आहे. स्वॉल यांनी एक्सवर नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द करण्याचं कारणही सांगितलं आहे. ते म्हणाले, “नेटफ्लिक्सने अशा व्यक्तीला कामावर ठेवून घेतलं आहे ज्याने चार्ली कर्कच्या हत्येनंतर जल्लोष केला होता. तसेच नेटफ्लिक्स लहान मुलांना तृतीयपंथीयांच्या बाजूने व त्याकडे आकर्षित करणारा (pro-trans) कॉन्टेंट प्रसारित करत आहे.
‘नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द करा’, मस्क यांचं आवाहन
दरम्यान, डॉजडिजायनर या एक्स पेजवरून केलेली यासंदर्भातील पोस्ट देखील मस्क यांनी रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की “तुमच्या मुलांचं संरक्षण करा, त्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द करा. तृतीयपंथीयांचा प्रचार करणाऱ्या कुटील डावापासून मुलांना दूर ठेवा.” ही पोस्ट रिपोस्ट करत मस्क म्हणाले, तुमच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रद्द करा.”
मस्क यांच्या कोणावर आक्षेप?
ज्या नेटफ्लिक्स कर्मचाऱ्यावर मस्क यांनी आक्षेप घेतला आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून नेटफ्लिक्सचे संचालक Hamish Steele आहेत. त्यांनी चार्ली कर्क यांच्या हत्येच्या घटनेनंतर कर्क यांची थट्टा उडवल्याचा आरोप आहे. स्टील हे नेटफ्लिक्सच्या ‘डेड एंड : पॅरानॉर्मल पार्क’ शोचे निर्माते देखील आहेत. स्टील यांचा नेटफ्लिक्सवरील शो डेड एंड : पॅरानॉर्मल पार्कमधील एक क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे या कार्यक्रमावर टीका देखील होत आहे. हा लहान मुलांवर आधारित एक अॅनिमेटेड शो आहे. यावर ट्रान्सफोबिक विरोधी विचारधारेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप होत आहे.