Reddit Post On Work From Home: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर नुकतीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये एका इंजिनिअरने वडिलांच्या अलिकडेच झालेल्या निधनानंतर, त्यांच्या बॉसने वर्क फ्रॉम होमची विनंती कशी नाकारली आणि त्याच्यासोबत काय घडले याबद्दल सांगितले आहे. या इंजिनिअरने रेडिटवरील लोकप्रिय फोरम इंडियन वर्कप्लेसवर त्यांचा त्रासदायक अनुभव शेअर केला आहे.
पोस्टमध्ये इंजिनिअरने नमूद केले आहे की, एका आठवड्यापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या मृत्यूपूर्वी, त्याने पाच दिवसांची रजा घेतली होती आणि वडील रुग्णालयात असताना एक आठवडा वर्क फ्रॉम होम केले होते. ही पोस्ट करतानाही इंजिनिअर अजूनही वडिलांच्या मृत्यूनंतरचे विधी पूर्ण करत होता.
हा इंजिनिअर गेल्या दोन महिन्यांपासून क्लायंटच्या ठिकाणी हायब्रिड पद्धतीने काम करत होता. त्याच्या वडिलांच्या निधनामुळे आणि त्यांची आई आता तिच्या गावी एकटी असल्याने, त्याने क्लायंट-साइड मॅनेजरकडून आणखी एक महिना वर्क फ्रॉम होमची विनंती केली होती.
पण, त्याला मॅनेजरकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत तुच्छ होता. मॅनेजरने या इंजिनिअरला सर्व विधी पूर्ण करून विलंब न करता कार्यालयात परत येण्याची सूचना केली. परिस्थिती अधिक स्पष्ट करण्यासाठी त्याने मॅनेजरला फोन करण्याचा प्रयत्न करूनही, त्याने या इंजिनिअरच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
आठवड्याच्या शेवटी धार्मिक विधींसाठी इकडे तिकडे प्रवास करण्याची आणि नंतर ऑफिसला परतण्याची शक्यता शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकवणारी वाटत होती. त्याने एका विशिष्ट तारखेपर्यंत वर्क फ्रॉम होम काम करणार असल्याचे जाहीर करणारा एक ठाम ईमेल पाठवण्याचा विचारही केला, परंतु अशा कृतीचे परिणाम होण्याची त्याला भीती वाटत होती.
त्याच्या या पोस्टने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जो अनेकांना पडला, आजच्या कॉर्पोरेट जगात पालकांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच कामावर परतणे खरोखर अपेक्षित आहे का?
या इंजिनिअरच्या भावनिक पोस्टनंतर रेडिटवर लगेचच प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. एकाने या इंजिनिअरला पाठिंबा दर्शविला आणि नोकरी गमावण्याच्या जोखमी असूनही त्याला जितके दिवस हवेत तितके दिवस सुट्टी घेण्यास प्रोत्साहित केले. या युजरने इंजिनिअरला आवश्यक असल्यास नवीन नोकरी शोधण्यासाठी रिज्युमे, रेफरल्स, एचआर कनेक्शन आणि डिस्कॉर्ड नेटवर्किंगद्वारे मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी इतर अनेक युजर्सनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले. एका युजरने शेअर केले की, त्याच्या वडिलांच्या निधनानंतर, त्याच्या कंपनीने त्याला कोणताही प्रश्न न विचारता केवळ ७-८ दिवसांची सुट्टीच दिली नाही तर त्याला यातून बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ घेण्याचा सल्ला देखील दिला.