भारताचे उपांत्य फेरीचे लक्ष्य; विराटसेना आज प्रथमच भगव्या जर्सीत अवतरणार

विश्वचषकाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड या बलाढय़ संघांमधील रविवारी होणारी लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत अपराजित राहात उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे तर गेल्या दोन सामन्यांतील पराभवांमुळे इंग्लंडचे बाद फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे भारताला हरवून उपांत्य फेरीची दावेदारी मजबूत करण्यासाठी इंग्लंडची कसोटी लागणार आहे. तर आपली विजयाची मालिका अखंडित ठेवून इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी विराटसेना प्रयत्नशील असेल.

सहा सामन्यांपैकी पाच विजय मिळवून भारताने ११ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी पुढील तीनपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भगव्या जर्सीत उतरणार आहे. त्यामुळे नव्या जर्सीत भारताची कामगिरी कशी होते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत विश्वचषकाची सुरुवात थाटात केली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून पराभूत झाल्यावर इंग्लिश संघ पेटून उठला होता. बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान यांना हरवत इंग्लंडने उपांत्य फेरीची दावेदारी मजबूत केली होती. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचे बाद फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. इंग्लंड सात सामन्यांत ८ गुणांनिशी चौथ्या क्रमांकावर असला तरी त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशपासून धोका आहे.

शंकर मोठी खेळी साकारेल – कोहली

सातत्याने अपयशी ठरत असला तरी अष्टपैलू खेळाडू विजय शंकरची कर्णधार विराट कोहलीने पाठराखण केली आहे. ‘‘विश्वचषकात शंकर नक्कीच मोठी खेळी साकारेल. पाकिस्तानविरुद्ध त्याने समाधानकारक खेळी केली; पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टीचा रागरंग पाहता तो आश्वासक दिसत होता. फटक्यांची निवड कशी करायची, यावर आम्ही चर्चा केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मात्र केमार रोचच्या अप्रतिम चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे शंकरच्या उणिवा शोधून त्याला बसवणे योग्य ठरणार नाही. क्रिकेटमध्ये काही वेळेला नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते. माझ्या मते, तो मोठी खेळी साकारण्याच्या अगदी जवळ आहे,’’ असे कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

धिम्या गतीच्या खेळपट्टीची चिंता

गेल्या दोन सामन्यांत धिम्या गतीच्या आणि काहीशा गोंधळात टाकणाऱ्या खेळपट्टय़ांवर भारताच्या मधल्या फळीची कसोटी लागली होती. पण गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने बाजी मारली होती. पण इंग्लंडविरुद्धही एजबॅस्टनच्या फिरकी आणि वेगवान माऱ्याला पोषक असलेल्या खेळपट्टय़ांवर भारताला झुंजावे लागणार आहे. त्यामुळे फलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी ही रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंडय़ा यांच्यावर असणार आहे.

ऋषभ पंतला संधी?

भारताला सर्वाधिक चिंता सतावत आहे ती चौथ्या क्रमांकाची. या स्थानावर स्थिरावलेल्या लोकेश राहुलने विश्वचषकातून माघार घेतलेल्या शिखर धवनची सलामीची जागा घेतल्यानंतर विजय शंकरला पाचारण करण्यात आले. पण शंकरला अद्यापही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र संघ व्यवस्थापन पूर्वीच्याच रणनीतीवर ठाम असल्यामुळे पंतला संधी कधी मिळणार, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

फलंदाजांवरील जबाबदारी वाढली

कर्णधार विराट कोहली फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देत असून गेल्या चार सामन्यांत त्याने अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. मात्र या खेळीचे शतकाच रूपांतर करण्यात त्याला अपयश आले आहे. रोहित शर्माही गेल्या दोन सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. राहुल उपयुक्त योगदान देत असला तरी त्यालाही मोठी खेळी करता आलेली नाही. शंकर पूर्णपणे अपयशी ठरला असताना पाचव्या क्रमांकावरील केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या संथ फलंदाजीमुळे भारताला गेल्या दोन्ही सामन्यांत मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आता बर्मिगहॅमच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या अव्वल गोलंदाजांचा सामना करताना धावांचा आलेख उंचावण्याची भारतीय फलंदाजांवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.

गोलंदाजांची चोख कामगिरी : गेल्या दोन सामन्यांत भारताला फारशा धावा उभारता आल्या नसल्या तरी गोलंदाजांनी मात्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत भारताला विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीने दोन सामन्यांत सात बळी मिळवत भुवनेश्वर कुमारची उणीव जाणवू दिली नाही. शमी बहरात आल्यामुळे आता जायबंदी भुवनेश्वर कुमारला खेळवण्याचा धोका भारतीय संघ व्यवस्थापन पत्करणार नाही. जसप्रीत बुमराही त्याला चांगली साथ देत आहे. कुलदीपला गेल्या दोन सामन्यांत एक बळी मिळवता आला असला तरी फिरकीपटू यजुर्वेद्र चहलने चार फलंदाजांना माघारी पाठवत भारताच्या विजयात योगदान दिले.

जेसन रॉयचे पुनरागमन

दुखापतीमुळे गेल्या तीन सामन्यांना मुकावे लागलेला इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय भारताविरुद्ध पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रॉयच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या जेम्स विन्स याला छाप पाडता आली नाही. जेसन रॉय १०० टक्के तंदुरुस्त नसला तरी बाद फेरीतील आव्हान धोक्यात आल्याने इंग्लंड संघ व्यवस्थापनाने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटही इंग्लंड संघात परतणार आहे. त्यामुळे आदिल रशीद किंवा मार्क वूड यांच्यापैकी एकाला अंतिम ११ जणांच्या संघातून वगळावे लागेल.

बेअरस्टो, मॉर्गनकडून चमकदार फलंदाजीची अपेक्षा

भारताविरुद्ध जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा इंग्लंडला असेल. कर्णधार ईऑन मॉर्गनने मधल्या फळीत चमकदार कामगिरी करावी, असे इंग्लंडला वाटत आहे. पाचव्या क्रमांकावरील बेन स्टोक्स तुफान फलंदाजी करत असताना जोस बटलर आणि मोईन अली यांच्याकडून भरीव योगदानाची अपेक्षा इंग्लंडला आहे.