लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी त्रिपुरात ८२ टक्के तर आसाममध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्रिपुरातील एका मतदारसंघासाठी तर आसाममधील पाच मतदारसंघांसाठी मतदान शांततेत पार पडले. आसाममधील तेजपूरमध्ये ७३ टक्के, जोरहाटमध्ये ७५ टक्के, लखीमपूरमध्ये ६७ टक्के, दिब्रूगडमध्ये ७० टक्के आणि कोलियाबोरमध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार पवनसिंग घटोवार आणि राणी नाराह यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री बी. के. हांडिक यांचे भवितव्य सोमवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंदिस्त झाले. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव, काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार मोनीकुमार सुब्बा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सबानंद सोनोवाल यांचेही भवितव्य यंत्रात बंदिस्त झाले. आसाममध्ये प्रथमच मतदान करणारे १८-१९ वर्षे वयोगटातील जवळपास ६.५ लाख मतदार असून ते मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरले होते.

आसाममध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रांमध्ये बिघाड
कालियाबोर (आसाम) : आसाममधील पाच लोकसभा मतदारसंघातील ३३ मतदान यंत्रांमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना २९ सदोष मतदान यंत्रे बदलणे भाग पडले. आसामच्या कालियाबोर मतदारसंघातून मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव हे निवडणुकीच्या रिंगणात असून या मतदारसंघातच मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडले. लखीमपूर, तेजपूर आणि दिब्रूगड येथे मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे उघडकीस आले.
फोटो गॅलरी: पहिल्या टप्प्यातील मतदान