Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील निक्कीच्या हुंडाबळी प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. निक्कीच्या वहिनीने म्हणजेच तिच्या भावाच्या बायकोने आता निक्कीच्या आई वडिलांवर हुंडा मागण्याचे आरोप केले आहेत. निक्कीला तिच्या नवऱ्याने जाळून मारलं. त्यानंर विपिनला आणि त्याच्या कुटुंबाला अटक करण्यात आली. निक्कीच्या बहिणीनेही याबाबत माहिती दिली होती. दरम्यान निक्कीच्या वहिनीने जे सांगितलं आहे त्यामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.
निक्कीची वहिनी मीनाक्षीचे आरोप काय?
मीनाक्षीचं लग्न निक्कीचा भाऊ रोहीत पायला याच्याशी २०१६ मध्ये झालं. मागच्या नऊ वर्षांत मी फक्त नऊ महिने सासरी राहिले. कारण सुरुवातीला हुंड्यावरुन वाद झाला होता. आमच्या लग्नात माझ्या वडिलांनी कार दिली होती. पण सासरचे लोक म्हणाले ही कार चांगली नाही, या कारमुळे रोहीतचा अपघात झाला. त्यानंतर रोज त्यावरुन मला ऐकवलं जाई. मीनाक्षीने हा आरोप केला आहे की तिची सासू, दोन्ही नणंदा म्हणजेच निक्की आणि कांचन माझे केस ओढून मला धक्काबुक्की करत होत्या. निक्कीचा मृत्यू झाला, मी जिवंत आहे इतकाच काय तो फरक. बाकी सगळ्या गोष्टी मी सहनच केल्या आहेत. मला हाकलण्यात आलं. मी माझ्या माहेरी राहते. निक्की आणि कांचन म्हणायच्या तू इथून निघ आम्ही रोहीतचं दुसरं लग्न लावून देऊ. असे आरोप निक्कीच्या वहिनीने म्हणजेच मीनाक्षीने केले आहेत.
माझा प्रचंड छळ करण्यात आला
मीनाक्षीने म्हटलं आहे की यांच्या मुलाने आणि त्यांनी जे केलं ते योग्य. मुलींबरोबर तसाच प्रकार घडला की तो छळ का? २०१८ मध्ये मी रोहीतच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली होती. मात्र रोहीतच्या घरातल्यांनी राजकीय दबाव आणला त्यामुळे २०२० मध्ये मला तक्रार मागे घ्यावी लागली. त्याच वर्षी मी माझ्या वडिलांना गमावलं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं अशा लोकांशी नातं ठेवू नकोस. मी घर वाचावं म्हणून गप्प बसले होते. आता वडीलच नाहीत त्यामुळे मी बेघर झाले असंही मीनाक्षीने म्हटलं आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
मुलीला एक नियम आणि सुनेला एक नियम
निक्की आणि कांचन या दोघींनाही लाडाकोडात वाढवण्यात आलं आहे. मी लग्न करुन त्यांच्या घरी गेले तेव्हा मला फोन जवळ बाळगण्याचीही मुभा नव्हती. मुलींना त्यांनी ब्युटी पार्लर उघडून दिलं होतं, इन्स्टाग्रामवरही दोघी सक्रिय होत्या. जर सुनेसाठी नियम होते तर घरातल्या मुलींसाठी नियम वेगळे का होते? मी कायमच त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला रोहीतच्या घरातल्यांनी एक ओझं समजूनच वागणूक दिली. निक्कीला त्यांनी वेळीच आवरलं असतं तर कदाचित गोष्टी इतक्या पुढे गेल्या नसत्या.