अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उलटतपासणी चालू आहे. या तपासणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरलच्या प्रश्नांना उत्तरं देताना अनेक दावे केले आहेत. त्यात त्यांनी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याहून मोठा दावा ट्रम्प यांनी आण्विक युद्धासंदर्भातला केला आहे. मी जगाला अण्वस्त्रयुद्धापासून वाचवलं आहे, असं ट्रम्प आपल्या जबाबात म्हणाले आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या या तपासणीची कागदपत्रे आता समोर आली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४७९ पानांचा जबाब
डोनाल्ड ट्रम्प यांचा जबाब तब्बल ४७९ पानांचा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार असून त्या दृष्टीने हा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वर्षी आपली संपत्ती जवळपास ३९ टक्क्यांनी जास्त दाखवल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र, त्याला विरोध करताना “तुम्ही हे प्रकरण रद्दबातल करायला हवं”, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.”मला स्वत: माझी बाजू मांडण्यासाठी इथे यावं लागलं ही लाजिरवाणी बाब आहे”, असंही ट्रम्प म्हणाले होते. मिंटनं एपी न्यूजच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
राष्ट्राध्यक्ष ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी!
दरम्यान, आपल्या जबाबात ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना कोणती महत्त्वाची कामं आपण केली, याचा पाढाच वाचला आहे. “राष्ट्राध्यक्षपद सांभाळणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. चीनसंदर्भातली अमेरिकेची भूमिका. रशिया युक्रेनमध्ये घुसखोरी करणार नाही याची काळजी घेणं आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनला अण्वस्र डागण्यापासून परावृत्त करणं अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या”, असं ट्रम्प आपल्या जबाबात म्हणाले आहेत.
पाच मजली इमारतीला भीषण आग, लहान मुलांसह ७३ जणांचा होरपळून मृत्यू; ‘ती’ एक चूक पडली महागात!
“जग आजही अण्वस्रयुद्धाच्या उंबरठ्यावर”
“मला वाटतं जर मी उत्तर कोरियाशी चर्चा केली नसती, तर तु्म्हाला अण्वस्रयुद्धाचे चटके सोसावे लागले असते. जर राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी निवड झाली नसती, तर अण्वस्रयुद्ध झालं असतं. मला तर वाटतं की अजूनही जग अण्वस्रयुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे”, असा गंभीर दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.