National Security Advisory Board Revamped by Modi Government : पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये (एनएसएबी) मोठे बदल केले आहेत. रॉचे (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) माजी अध्यक्ष आलोक जोशी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या समितीत इतर सहा सदस्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीत माजी एअर कमांडर पी. एम. सिन्हा, माजी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना, राजीव रंजन वर्मांसह लष्करी व भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोदी सरकार अधिक सतर्क झालं आहे. या हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिरवा कंदिल दिला. तसेच संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीमध्ये दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट व थेट संदेश मोदी यांनी दिला आहे.
एनएसएबीवर मोठी जबाबदारी
एनएसएबी हे एक असं पथक आहे ज्यामध्ये सरकारच्या बाहेरील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी असतात. प्रामुख्याने भारतीय लष्कर, गुप्तचर यंत्रणा, भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी या समितीत काम करतात. देशाच्या सुरक्षेसंबंधीच्या मुद्द्यांचं विश्लेषण करणे, सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांवर उपाय व धोरणात्मक पर्यायांची शिफारस करणे हे या पथकाचं प्रमुख काम आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी अध्यक्ष आलोक जोशी आता या समितीचे प्रमुख म्हणून कामकाज पाहतील.
पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन बैठका
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एका सुरक्षेच्या प्रश्नावर कॅबिनेट समितीची (सीसीएस) बैठक बोलावली होती. त्यानंतर राजकीय मुद्द्यांसाठीच्या कॅबिनेट समितीची म्हणजेच सीसीपीएची बैठक बोलावण्यात आली. पाठोपाठ अर्थविषयक कॅबिनेट समिती म्हणजेच सीसीईएची बैठक पार पडली. आता संपूर्ण कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकांमधील निर्णयांची सविस्तर माहिती काही वेळाने समोर येईल.