Elon Musk Collegue Speaks About His Rules: एलॉन मस्क हे नाव आता जगभरात सर्वश्रुत झालं आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या महाकाय कंपन्यांचे प्रमुख म्हणून एलॉन मस्क हे परिचित आहेतच. पण त्याचबरोबर जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण जाहीर संपत्ती ही ३८५ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी प्रचंड आहे. मध्यंतरीच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली त्यांची ‘घट्ट’ मैत्रीही चर्चेचा विषय ठरली होती. तसेच त्यांचे वादही चर्चेत आले. पण एलॉन मस्क यांनी इतकी उंच भरारी नेमकी कशाच्या जोरावर घेतली? त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने यासंदर्भातला अनुभव शेअर केला आहे.
एलॉन मस्क यांच्यासोबत कधीकाळी टेस्लामध्ये काम करणारे त्यांचे सहकारी रसेल वॅरोन यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये एलॉन मस्क यांच्यासंदर्भातला अनुभव सांगितला आहे. “मी टेस्लात असतानाच्या माझ्या अनुभवावरून एलॉनबद्दलच्या या काही गोष्टी आहेत. मी एलॉनसोबत केलेल्या प्रत्येक बैठकीसाठी काही साधे सरळ नियम असायचे. या बैठकीत कोणतंही पीपीटी प्रेझेंटेशन व्हायचं नाही. कोणत्या चुका, सुधारणा वा अडचणींबाबत तुम्हाला एलॉनचा सल्ला हवाय, तेवढंच बोलायचं. शिवाय मीटिंगला येताना खायच्या काही गोष्टी आणायच्या नाहीत. मीटिंग खूप स्पष्ट मुद्द्यांवर हवी. कृतीवर बोलायला हवं”, असं या पोस्टमध्ये रसेल यांनी म्हटलं आहे.
“एलॉन स्वत: कधीकधी मीटिंगदरम्यान खायचे, पण …”
दरम्यान, एलॉन मस्क स्वत: कधीकधी मीटिंगदरम्यान खायचे, असंही रसेल यांनी पोस्टच्या खालील कमेंटमध्ये म्हटलं आहे. “एलॉन स्वत: मीटिंगदरम्यान खायचे. पण दररोज किमान १६ तास जर तुम्ही सलग वेगवेगळ्या मीटिंग करत असाल, तर काय होणार?” असं रसेल यांनी नमूद केलं. शिवाय, एलॉन मस्क खूप सारं डाएट कोक पितात, असंही रसेल यांनी सांगितलं आहे.
“तुम्ही जर एलॉन मस्कसाठी काम करत आहात, तर तुम्ही नॉर्मल नाही आहात. प्रश्न सोडवणं हे तुमचं टार्गेट असतं. एखाद्या वेळी तुम्हाला प्रश्न सोडवता आला नाही, त्या क्षणी तुम्ही एलॉनकडे मदत मागणं अपेक्षित असतं”, असं उत्तर रसेल यांनी एका युजरला कमेंटमध्ये दिलं.
“एलॉन एक उत्तम श्रोता आहे”
याच पोस्टच्या कमेंटमध्ये एका ठिकाणी रसेल यांनी एलॉन एक उत्तम श्रोता असल्याचं नमूद केलं आहे. “तो समोरच्याचं म्हणणं उत्तमप्रकारे एकून घेतो. त्यातून ताबडतोब महत्त्वाचे मुद्दे हेरून त्यावर सल्ला देतो”, असं रसेल यांनी नमूद केलं आहे.
एलॉन मस्क यांचं उत्तर!
दरम्यान, एलॉन मस्क यांनी रसेल यांच्या पोस्टवर उत्तरदेखील दिलं आहे. “जर तुम्ही उपाशी असाल, तर मीटिंगमध्ये खायच्या गोष्टी आणल्या तर चालतील”, असं मस्क यांनी उत्तरादाखल केलेल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे.