देशात करोना लसींचा तुटवडा जाणवल्यानंतर भारत सरकारने लसींची निर्यात बंद केली होती. आता पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना अतिरिक्त लसींची निर्यात आणि मदत करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये अतिरिक्त डोसची निर्यात होणार आहे. देशात आतापर्यंत ८१ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं गेलं आहे. गेल्या ११ दिवसात १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

“सप्टेंबरमध्ये भारत सरकारला भारतीय कंपन्यांनी बनवलेले २६ कोटी लसींचे डोस मिळाले. लसीकरणाचं कामही सातत्याने वाढत आहे. पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आम्हाला ३० कोटींपेक्षा जास्त डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्पादन आणखी वाढेल”, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. “चौथ्या तिमाहीत आम्ही लस मैत्री कार्यक्रम पुढे नेऊ. या कार्यक्रमांतर्गत आम्ही जगाला मदत करू. गेल्यात चार दिवसात दिवसाला आम्ही एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं आहे. आजही लसीकरणाची संख्या एक कोटीच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

देशात आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने याबाबतची आकडेवारी दिली होती. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे.