नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात दबाब वाढू लागला आहे. कोश्यारी यांच्या गैरवर्तनाची गंभीर दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे. शेट्टी यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, राष्ट्रपतींची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यानंतर हकालपट्टीची मागणी करणारे पत्र शेट्टी यांनी राष्ट्रपती कार्यालयाकडे सुपूर्द केले. राज्यपाल कोश्यारींच्या विधानांवर शिवसेना-उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. कोश्यारींच्या हकालपट्टीसाठी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने आंदोलनही केले आहे. आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रपतींकडे रीतसर पत्राद्वारे मागणी केली आहे.

महाराष्ट्रासाठीच नव्हे तर, अवघ्या देशातील जनतेसाठी आदरस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल जाहीरसभेत कोश्यारी यांनी अनुद्गार काढले. त्यांच्या वादग्रस्त विधानांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असेलच. कोश्यारी यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त विधान केलेले नाही. यापूर्वीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयीही कोश्यारी यांनी अवमानजनक विधान केले होते. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाच्या प्रतिष्ठेला धक्का लावला आहे. त्यामुळे कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून तातडीने हकालपट्टी करावी, असे पत्रात म्हटले आहे. आक्षेपार्ह विधानांमुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गुरुवारी दिल्लीला येण्याची शक्यता असून कदाचित केंद्रातील वरिष्ठांची भेट घेतील.