मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सिंगापूर एअर फोर्सची दोन एफ-१६ विमाने तात्काळ मदतीसाठी पाठवण्यात आली. मंगळवारी सिंगापूरच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास हे विमान चानगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले.

या विमानात एकूण २६३ प्रवासी होते. मुंबईहून सिंगापूरला येणाऱ्या एसक्यू ४२३ विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. सिंगापूर एअरलाइन्सकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. विमानामध्ये २६३ प्रवासी होते. आम्ही यंत्रणेला तपासामध्ये सहकार्य करत आहोत. यापेक्षा जास्त तपशील देता येणार नाही असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.

या विमानाच्या संरक्षणासाठी दोन एफ-१६ विमाने पाठवण्यात आली होती. प्रवासी विमानाचे लँडिंग होईपर्यंत आमची विमाने सोबत होती असे सिंगापूर एअरफोर्सकडून सांगण्यात आले. सोमवारी रात्री ११.३५ च्या सुमारास सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर धमकीचा फोन मिळाला. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली.