फेसबुक, गूगल इंडियाचा जाहिरात महसूल सर्वाधिक ; भारतीय प्रसार माध्यमेही उत्पन्नात मागे

भारतातील पारंपरिक डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी ही चिंतेची बाब आहे.

नवी दिल्ली :फेसबुक आणि गूगल यांना जाहिरातींतून मिळणारा एकत्रित महसूल पहिल्या दहा क्रमांकांवरील पारंपरिक प्रसार माध्यमांपेक्षा सुमारे १५ हजार कोटी रुपये अधिक असल्याचे ‘दि इंडियन एक्सप्रेस’ने केलेल्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. भारतातील पारंपरिक डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी ही चिंतेची बाब आहे.

भारतातील डिजिटल प्रसार माध्यमांना जाहिरातींतून मिळणाऱ्या एकूण महसुलात ८० टक्के वाटा फेसबुक इंडिया आणि गूगल इंडिया यांचा आहे. ऑनलाइन जाहिराती हळूहळू इतर माध्यमांच्या हातून निसटत असल्याचे सर्वाना माहित होते; मात्र फेसबुक आणि गूगल या बडय़ा तंत्रज्ञानकंपन्यांना भारतातील ‘व्यवहारांतून’ (ऑपरेशन्स) मधून मिळणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरून पारंपरिक माध्यम कंपन्यांना खबरदारीचा इशारा मिळाला आहे. भारतातील पहिल्या दहा क्रमांकांवरील पारंपरिक माध्यम कंपन्यांना जाहिरातींतून ८,३९६ कोटी रुपये महसूल मिळत असताना;  फेसबुक आणि गूगल या दोन बडय़ा तंत्रज्ञान कंपन्यांचा एकत्रित जाहिरात महसूल (अ‍ॅड रेव्हेन्यू) त्यांच्याहून अधिक, म्हणजे २३,२१३ कोटी रुपये इतका असल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ने केलेल्या विश्लेषणात आढळले आहे.

भारतातील माध्यम कंपन्यांपैकी सर्वाधिक भांडवल असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस’चा गेल्या आर्थिक वर्षांतील महसूल ७,७२९ कोटी रुपये होता. यापैकी जाहिरातींचा महसूल सुमारे ३,७१० कोटी रुपये होता. या तुलनेत, फेसबुक इंडियाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील जाहिरातींचा महसूल ९,३२६ कोटी रुपये; तर गुगलचा जाहिरातींचा महसूल १३,८८७ कोटी रुपये होता. सर्वात मोठय़ा प्रक्षेपण कंपन्यांपैकी ‘सन टीव्ही नेटवर्क’चे जाहिरातींतून मिळालेले आणि ‘ब्रॉडकास्ट स्लॉट्स’च्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न ९९८.९ कोटी रुपये होते; जे केवळ फेसबुकच्या जाहिरातींच्या उत्पन्नाच्या एक दशांश इतके होते!

तुलनात्मक आकडे

बाजारपेठेत सर्वाधिक भांडवल असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस’चा गेल्या आर्थिक वर्षांतील महसूल ७,७२९ कोटी रुपये होता. यापैकी जाहिरातींचा महसूल सुमारे ३,७१० कोटी रुपये होता. त्या तुलनेत, फेसबुक इंडियाचा जाहिरात महसूल ९,३२६ कोटी रुपये आणि गुगलचा जाहिरात महसूल १३,८८७ कोटी रुपये इतका होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facebook google india s have highest advertising revenue zws

ताज्या बातम्या