देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून अफवांचं पिक आलं आहे. वेगवेगळे मेसेज सोशल मीडियावर फिरत असून, यात अनेक नागरिक अमिषांना बळी पडत आहे.

सोशल मीडियावरुन आपल्यापर्यंत येणारी माहिती किती विश्वासार्ह असेल सांगता येत नाही. त्यातही व्हॉट्स अॅप सारख्या माध्यमातून तर अनेक चांगले-वाईट, फसवणूक होईल अशा पद्धतीचे मेसेज फिरत असतात. यात प्रामुख्यानं भरणा असतो तो आर्थिक आमिष देणाऱ्या मेसेजचा. कोविडच्या काळात अर्थचक्र मंदावलेलं असतानाच्या काळात असे आर्थिक फसवणूक करणारे मेसेज फिरताना दिसतात. त्यातच आता एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. या मेसेजबद्दल पीआयबीने खुलासा केला आहे.

कोविडच्या काळात अनेकांचा रोजगार गेला आहे. बेरोजगारी वाढताना दिसत असून, अनेकवेळा नागरिकांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची मागणीही केली गेली. पण, अशाच पद्धतीचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून हा मेसेज फिरत असून, यातून नागरिकांची दिशाभूल होईल अशा पद्धतीचा संदेश आहे.

व्हॉट्स अपवरून फिरणाऱ्या मेसेजमध्ये काय म्हटलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्यांसाठी संवादाचं प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्स अपवरून केंद्र सरकारकडून प्रत्येकाला पैसे दिले जाणार असल्याचं म्हटलेलं आहे. केंद्र सरकारकडून करोना केअर फंड योजनेच्या माध्यमातून केंद्र प्रत्येक नागरिकाला ४००० रुपयांची मदत देणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे. या मेसेजवर ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने व्हायरल होत असलेल्या मेसेजमधील माहितीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारे मदत करणार असल्याची कोणतीही केंद्राची योजना नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे.

कोविडचा काळ असल्याने केंद्र सरकारकडून थेट पैशांच्या स्वरूपात मदत केल्याचं कधीही म्हटलेलं नाही. मात्र, देशातील रेशनधारक नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केलेली आहे. लॉकडाउन लागू केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली होती.