Crime News : पंकज मोहन शर्मा नावाच्या एका एमबीबीएस डॉक्टरने कार्डिओलॉजिस्ट असल्याचे भासवून आठ महिन्यांच्या कालावधीत ५० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या फरीदाबाद येथील बादशाह खान सिव्हिल हॉस्पिटलमधील हार्टकेअर सेंटरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवी घेतलेली असली तरी शर्मा याच्याकडे गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे त्याचे बिंग फुटण्यापूर्वी त्याने असंख्य लोकांचे जीव धोक्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील संजय गुप्ता यांनी ११ एप्रिल रोजी एनआयटी फरिदाबाद पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर डॉ. शर्मा हा पोलिसांच्या नजरेत आला. दरम्यान गुप्ता यांनी सूत्रांचा हवाला देत या डॉक्टरने बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसरी पदवी मिळवल्याचा आरोप केला आहे .
प्राथमिक तपासानुसार, शहरात प्रॅक्टिस करणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज मोहन यांना देण्यात आलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनकडून (एनएमसी) देण्यात आलेल्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करून आरोपी शस्त्रक्रिया करत होता. न्यूज१८ ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पंकज मोहन शर्मा यााला गेल्या वर्षी जुलै महिन्यात मेडिटेरियन हॉस्पीटलने कामावर ठेवले होते. हे एक सरकारी-खाजगी भागीदारीतून चालवले जाणारे बादशाह खान सिव्हील हॉस्पीटलमधील हार्ट केअर सेंटर आहे.
तपासात असे समोर आले की, डॉ. शर्मा हा दुसऱ्या एका डॉक्टरच्या नावाने काम करत होता, यासाठी तो डॉ. मोहन यांचा नोंदणी क्रमांक वापरत होता. हा प्रकार तेवढ्यावरच थांबला नाही. डॉ. शर्मा यांच्या प्रिस्क्रिप्शनवर त्यांची ओळख हृदयरोगतज्ज्ञ – डीएनबी (कार्डियोलॉजी) अशी देण्यात आलेली होती. ही पदवी एमडीच्या तोडीची पदव्युत्तर पदवी आहे.
रुग्णालय व्यवस्थापनाने एका आवश्यक असणारे ज्ञान नसलेल्या आणि फसव्या डॉक्टरला कामावर ठेवले, ज्याच्याकडे कोणतीही पदवी किंवा कार्डिओलॉजीतील स्पेशलायजेशन नव्हते. डॉ. शर्मा यांनी त्यांच्याकडे एमडी आणि डीएनबी (कार्डियोलॉजी) ही पात्रता असल्याचा दावा केला, जे पूर्णपणे फसवणूक करणारे आहे, असे वकील गु्प्ता म्हणाले.
दरम्यान डॉ. मोहन यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे यावर्षी जानेवारीमध्ये शर्मा हे त्यांच्या कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर करत असल्याची तक्रार केली. तसेच बेकायदेशीर कारवाया लक्षात आल्यानंतर त्यांनी शर्मा यांना एक कायदेशीर नोटीस देखील पाठवली.
डॉक्टर शर्मा यांना त्यांची वैद्यकीय पदवी दाखविण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये अचानक हार्ट सेंटरमध्ये जाणे बंद केले, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात संशय बळावला. रुग्णांनी त्यांच्याबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली आणि खऱ्या डॉ. पंकज मोहन यांना भेटायला गेले. यावेळी डॉ. मोहन यांनी आपण कधीही हार्ट सेंटरमध्ये काम केले नसल्याचे स्पष्ट केले, ज्यामुळे आरोपांना आणखी मजबुती मिळाली.