पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजप आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

लोकसत्ता विश्लेषण : पंतप्रधान मोदींचा ताफा अडवणारी शेतकरी संघटना अजूनही आंदोलन का करत आहे?; जाणून घ्या…

दरम्यान या घटनेनंतर भारतीय किसान युनिअनच्या (क्रांतीकारी) सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग रोखल्याबद्दल सहकारी आंदोलकांचे आभार मानले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बीकेयूचे नेते सुरजीत सिंह फूल आंदोलकांना संबोधित करताना म्हणत आहेत की, “तुम्ही दाखवलेल्या ताकदीमुळे मोदी फिरोजपूरमध्ये रॅली काढू शकले नाहीत”.

बसवर उभं राहून बोलत असताना त्यांनी म्हटलं की, “आपण रॅलीपासून १० ते ११ किमी अंतरावर रस्ता अडवण्यात यशस्वी झालो आहोत. याच भाजपाने आपल्यावर पाण्याचा मारा केला होता आणि रस्त्यावर कुंपण लावलं होतं. पण आता आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं आहे”.

मोदींना शारीरिक इजा पोहोचण्याचा धोका निर्माण केल्याचा आरोप

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यामुळे त्यांना शारीरिक इजा पोहोचण्याचा धोका निर्माण केल्याचा थेट आरोप केंद्रीयमंत्री व भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. मात्र, मोदींच्या सुरक्षेत कोणताही गलथानपणा झाला नाही. हेलिकॉप्टरऐवजी कारने जाण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. रात्रभर व्यक्तिश: लक्ष घालून मोदींच्या सभेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी केला.

जाहीर सभा रद्द झाल्याबद्दल, ‘‘मोदींच्या सभेसाठी ७० हजार खुर्च्या मांडल्या होत्या पण, तिथे जेमतेम ७०० लोक आले होते’’, अशी खोचक टिप्पणी चन्नी यांनी केली. ‘सुरक्षा त्रुटी’संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचा तसेच, सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला दिले. फिरोजपूरमध्ये जाहीरसभेसाठी १० हजार पोलीस तैनात करून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिले.

खराब हवामानामुळे ऐनवेळी बदल

विधानसभा निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करत आहेत. पंजाबमध्ये मोदींची पहिलीच निवडणूक जाहीरसभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मोदी बुधवारी भटिंडा विमानतळावर उतरले, तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. पाऊस पडत असल्याने व खराब हवामानामुळे मोदी विमानतळावर २० मिनिटे थांबले होते. पण, दृष्यमानता कमी असल्याने कारने स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदींचा ताफा रस्त्याच्या मार्गाने दोन तास प्रवास करणार असल्याची माहिती पंजाबच्या पोलीस महासंचालकांना कळवण्यात आली. संपूर्ण नियोजित मार्गावर आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आल्याची पोलीस महासंचालकांकडून खात्री करून घेतल्यानंतर मोदींचा ताफा विमानळावरून रवाना झाला, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘मी जिवंत परतलो..’

शेतकरी आंदोलकांनी ताफा अडवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माघारी परतावे लागल़े ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत परतलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा’ अशी उपरोधिक टिपण्णी मोदी यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांना उद्देशून केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिल़े

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer union leader thanks protesters for stopping pm modi in punjab video viral sgy
First published on: 06-01-2022 at 12:10 IST