Punjab Accident : पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पटियालामधील सामना रोडवर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालकासह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पंजाबमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शाळकरी मुलांना घेऊन जाणारी गाडी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर ट्रकने या विद्यार्थ्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात ६ शाळकरी विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांच्या वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

तसेच या घटनेत जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान, टिप्पर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

पंजाबचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पलविंदर सिंग चीमा यांनी या घटनेबाबत सांगितलं की, “अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे. इनोव्हा कारमध्ये ७ शाळकरी मुले आणि एक चालक प्रवास करत होते. आम्हाला माहिती मिळाली की यापैकी ६ मुले आणि इनोव्हा कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टिप्पर ट्रक आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस जवळपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच या घटनेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच यातील दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन पंजाबचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पलविंदर सिंग चीमा यांनी दिलं आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे.