Congress Criticizes Nitin Gadkari, Targeted over Sons Ethanol Companies: इथेनॉल धोरणामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशात, आता गुरुवारी काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. काँग्रेसने म्हटले आहे की, नितीन गडकरी यांच्या मुलांच्या इथेनॉल उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही काळात वेगाने पैसे कमवले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते पवण खेरे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले की, “निखिल गडकरी आणि सारंग गडकरी हे नितीन गडकरी यांचे पुत्र आहेत. नितीन गडकरींच्या दोन्ही पुत्रांच्या सियान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्य इथेनॉलचे उत्पादन करतात. सरकारमध्ये असलेले वडील धोरणे बनवत आहेत आणि मुले पैसे कमवत आहेत.”

३७ रुपयांचा शेअर, ६३८ रुपयांवर

काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, “जून २०२४ मध्ये निखिल गडकरी यांची कंपनी सियान अ‍ॅग्रोचा महसूल १८ कोटी रुपये होता, जो जून २०२५ मध्ये वाढून ७२३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी २०२५ मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत ३७ रुपये होती, जी आता ६३८ रुपये झाली आहे.”

पवण खेरा पुढे म्हणाले की, “गेल्या ११ वर्षांत कोणतीही योजना वेळेवर पूर्ण झाली नाही, परंतु देशाने २०२५ च्या अंतिम मुदतीपूर्वी २० टक्के इथेनॉल मिश्रण साध्य केले आहे.”

१ लिटरही इथेनॉल तयार झालेले नाही

या पत्रकार परिषदेत पवण खेरा पुढे म्हणाले की, “नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी जून २०१४ मध्ये सांगितले होते की, महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे पेट्रोल ५५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५० रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल. सप्टेंबर २०१८ मध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की, सरकार पाच असे प्लांट उभारेल जिथे भूसा आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून इथेनॉल तयार केले जाईल. सत्य असे आहे की, आजपर्यंत भूसा आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून १ लिटरही इथेनॉल तयार झालेले नाही.”

“६२७ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे, ज्यामध्ये ५६ टक्के ऊस आणि उर्वरित धान्य वापरले गेले आहे. लाकडाचा भूसा आणि महानगरपालिकेचा कचरा कुठेही वापरला गेला नाही. १ लिटर इथेनॉल बनवण्यासाठी सुमारे ३,००० लिटर पाणी वापरले जाते. म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा दावा देखील केवळ घोषणा ठरला”, असेही खेरा म्हणाले.