मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालेल्या दलित तरुणाच्या अंध वडिलांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील अलवर येथे गेल्या महिन्यात एक हरिश जाटव याचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झाला होता. गुरुवारी त्याचा वडिलांनी आत्महत्या केली. आपल्या मुलाला न्याय मिळवून देऊ न शकल्याने ते नाराज होते. तसंच पोलिसांच्या तपासावर नाराज असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.

रतीराम जाटव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, “त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासावर ते नाराज होते. पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप होता”. आपल्या शेवटच्या क्षणीदेखील रतीराम पोलिसांवर आरोप करत होते असं नातेवाईकांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतीराम जाधव यांना रुग्णालयात आणलं तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. १६ जुलै रोजी हरिश जाटव याच्या दुचाकीने एका महिलेला धडक दिली होती. यानंतर त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

“अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी हरिश मारहाण केली होती, ज्यामुळे तो बेशुद्द पडला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथून त्याला दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याचा मृत्यू झाला”, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

पोलिसांनी मात्र लिंचिंग झालं नसल्याचं म्हटलं होतं. मॉब लिंचिंग सिद्द करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पेहलू खान मॉब लिचिंग प्रकऱणातील सहा आरोपींची सुटका झाल्यानंतर दोन दिवसांनी आता ही आत्महत्येचं वृत्त आलं आहे.