FBI Director Kash Patel faces Hate for Diwali post: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या विभागाचे संचालकपद भारतीय वंशाचे नागरिक काश पटेल यांच्याकडे सोपवले होते. भगवद्गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी संचालकपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे ते भारतात कौतुकाचा विषय ठरले. काश पटेल यांनी नुकतीच दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट एक्सवर शेअर केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतून द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना करावा लागत आहे.

एफबीआय ही अमेरिकेतील एक महत्त्वाची संस्था आहे. त्याच्या संचालकपदावरील व्यक्ती हा महत्त्वाचा नेता मानला जातो. मात्र इतक्या उच्च पदावर असतानाही काश पटेल यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दिवाळी निमित्त सोमवारी (२० ऑक्टोबर) पटेल यांनी एक पोस्ट शेअर केली होती.

या पोस्टमध्ये अतिशय साधारण संदेश होता. “दिवाळीच्या शुभेच्छा! वाईटावर चांगल्याचा विजय, याचे प्रतीक म्हणून जगभरात प्रकाशाचा उत्सव साजरा केला जात आहे”, या कॅप्शनसह त्यांनी खाली एक फोटो शेअर केला. ज्यावर शुभ दिवाळी असे लिहिले होते. आक्षेपार्ह किंवा तक्रारीचा सूर काढावा, असे या संदेशात काहीही नव्हते. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशाप्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तरीही अनेक अमेरिकन नागरिकांनी या पोस्टखाली कमेंटमध्ये नाराजी व्यक्त केली.

या पोस्टचे अनेकांनी स्वागत केले असले तरी त्याच्यावर काही जणांनी टीकाही केली. एका युजरने या पोस्टखाली लिहिले, “सर, कृपया अमेरिकेत तुम्ही विदेशातील उत्सवांना प्रोत्साहन देऊ नका.” दुसऱ्याने म्हटले, “हा उत्सव इथला नाही, कृपया तो इथे आणण्याचा प्रयत्न थांबवा.” काहींनी म्हटले की, अमेरिका हा ख्रिश्चन देश आहे. तुम्हाला हे माहीत नाही का?

सर्व हिंदूंना हद्दपार करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचा सपाटा सुरू झाला आहे. रिपब्लिकन याचे जोरदार समर्थन करतात. याच प्रकारचे विचार काहींनी व्यक्त केले. एका युजरने तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले, “सर्व हिंदूंना इथून हद्दपार केले पाहिजे.”

kash-patel-x-post-comment-against-him
काश पटेल यांच्याविरोधात व्यक्त झालेली काही निवडक मते.

काहींनी हिंदू उत्सवांवर टीका करताना प्रदूषणाचा हवाला दिला. भारतातील नद्या उत्सवांमुळे प्रदूषित होतात, याकडे अनेकांनी फोटो पोस्ट करून लक्ष वेधले. एका व्यक्तीने म्हटले, मला भारतात नाही तर अमेरिकेत राहायचे आहे. काश पटेल यांच्या विरोधात पोस्ट झालेल्या कमेंट्सनाही हजारो लोकांनी लाईक करून पाठिंबा दर्शवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी

काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. “काश मला आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्व एजंट्सना त्याच्याप्रती असलेला आदर”, असे गौरवोद्गार ट्रम्प यांनी त्यांच्या नियुक्ती करताना काढले होते. डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “काश पटेल आतापर्यंतचा सर्वोत्तम संचालक म्हणून ओळखला जाईल. तो एक अतिशय मेहनती आणि कणखर व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका आहेत.”