नवी दिल्ली : सिंघू सीमेवर एका दलित शीख व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करून  पोलिसांनी  उभारलेल्या अडथळ्यांवर त्याचा मृतदेह टांगल्याप्रकरणी  चौकशीच्या  मागणीसाठी पंधरा दलित संघटनांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन दिले आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

पंजाबच्या तरण तारण जिल्ह्य़ातील लखबीर सिंग  याची हत्या  करून  मृतदेह पोलिसांनी लावलेल्या अडथळ्यांवर टांगण्यात आला होता.  ही हत्या निहंग  शीख समुदायातील काही व्यक्तींनी केल्याचा आरोप होत आहे. पंधरा दलित संघटनांनी याप्रकरणी निवेदन दिले असून त्यात अखिल भारतीय खाटिक समाज, अखिल भारतीय बेरवा विकास संघ, धनक वेलफेअर असोसिएशन, दलित कामगार संघटना यांचा समावेश आहे.  अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय संपला यांना हे निवेदन देण्यात आले.  

सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी आरोप केला आहे की,  शेतकरी नेत्यांची अनागोंदी आता उघड झाली आहे.

अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणी हरयाणा पोलिसांना कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला असून पोलिसांनी २४ तासांत अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले आहे.  हत्या झालेली ही दलित शीख व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना काही निहंग शीख त्याच्याभोवती उभे असलेली चित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. या व्यक्तीचा कापलेला डावा हात बाजूला पडलेला या चित्रफितीत दिसत आहे.

तरणतारण येथून आलेल्या वृत्तानुसार, सिंघू सीमेवर हत्या करण्यात आलेल्या लखबीर सिंग याच्या  मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली.    त्याची पत्नी जसप्रीत कौर, आणि १२,११ व ८ वर्षे वयाच्या मुली एका कच्च्या घरात राहतात. चीमा कलानचे ते रहिवासी आहेत.  कुटुंबीयांनी म्हटले आहे, की लखबीरचा  राजकीय संघटनांशी संबंध नव्हता.

लखबीर सिंग (वय ३५) याच्या  हत्येनंतर निळ्या रंगाचा पोशाख केलेल्या एका निहंग शिखाने आपणच त्याला शीख धर्मग्रंथाची विटंबना केल्याने ही शिक्षा केली असे म्हटले आहे.  त्याचे नाव सरबजित सिंग असून तो पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्य़ातील विटवाहचा रहिवासी आहे, त्याला नंतर अटक करण्यात आली.

आणखी एकास अटक

एक्स्प्रेस वृत्तसेवा, अमृतसर : सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनस्थळी लखबीर सिंग याची हत्या केल्याचा दावा करणाऱ्या सर्बजित सिंग याची शनिवारी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली असतानाच, आणखी एका निहंग शिखाला अमृतसरमधील अमरकोट खेडय़ात अटक करण्यात आली. त्याने मात्र आपण ‘आत्मसमर्पण’ केल्याचा दावा केला आहे.

लखबीर सिंगवर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याच्या पायावर ३७ जखमा असल्याचे शवचिकित्सेत आढळले. सर्बजित व लखबीरप्रमाणेच नारायण हाही मझहबी (धर्मातरित) शीख आहे. लखबीरने गुरू ग्रंथ साहिबची ‘विटंबना’ केल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचा त्याचाही दावा आहे.

‘शरण येण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मी पोलिसांना कळवले होते आणि मला आधी अकाल तख्त साहिबला जाऊ देण्याची विनंती त्यांना केली होती. तथापि, माझ्या फोननंतर पोलिसांनी आमच्या गावाला वेढा घातला. मी हत्येची कबुली दिली आहे’, असे नारायणने ‘शरणागती पत्करण्यापूर्वी’ पोलिसांना सांगितले.

आपला ‘गट’ गेले १० महिने शेतकरी आंदोलनाचा भाग असून; किसान मजदूर संघर्ष समितीने ऑक्टोबर २०२० मध्ये अमृतसरनजीकच्या जांडियाला गुरू येथे रेल रोको केला, त्या वेळी आम्ही त्यांना जेवण पुरवले होते, असे नारायण म्हणाला.

पंजाबमध्ये गुरू ग्रंथ साहिबची विटंबना होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने आपले वडील अस्वस्थ होते, असे नारायणचा मुलगा लवप्रीत याने सांगितले.

‘कायद्याचा धाक नाही’

हत्या झालेल्या लखबीरची पत्नी जसप्रीत कौर आणि बहिण राज कौर यांनी म्हटले आहे, की लखबीर सिंग याला गुरू  ग्रंथसाहिबबाबत आदरच होता. तो पापभीरू होता. तो धर्मग्रंथाची विटंबना करू शकत नाही. तो गुरुद्वारात जात असे व कुटुंबीयांसमवेत प्रार्थना करीत असे. जसप्रीत व राज कौर यांनी म्हटले आहे, की जरी क्षणभर आपण लखबीरने हा गुन्हा करून काही चूक केली असे गृहीत धरले तरी त्याला क्रूर पद्धतीने मारण्याऐवजी निरपराधित्व सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी होती.  त्याला त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असते तरी चालले असते.ज्या पद्धतीने ही घटना घडली यात कायद्याचा धाकच राहिलेला नाही असे दिसते.